Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सवाईच्या स्वरमंचावरील युवा प्रतिभेला पदार्पणात मिळाली भरभरून दाद

सिद्धार्थ बेलमण्णू, अनुराधा कुबेर, पं. रूपक कुलकर्णी यांचे आश्वासक सादरीकरण

पुणे : ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच कला सादर करणार्‍या कलाकारांनी, सांगीतिक प्रतिभेचे उन्मेष दर्शवत, जाणकारांची दाद मिळवली. अभिजात भारतीय संगीताची धुरा पेलणारी युवा पिढी, या प्रस्तुतीतून रसिकांसमोर आली. सवाई च्या चौथ्या सत्राचे हे वैशिष्ट्य ठरले.

आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात सुरू आहे. शनिवारी महोत्सवाच्या चौथ्या सत्राची सुरुवात युवा गायक सिद्धार्थ बेलमण्णू यांच्या गायनाने झाली. बंगळूरु येथील या प्रतिभावान गायकाने राग भीमपलास सादर केला. गुरू पं. विनायक तोरवी यांच्याकडून त्यांना किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे मार्गदर्शन लाभले आहे. विलंबित एकतालातील ‘अब तो बडी बेर भयी…’ या रचनेतून एक शांत, करुणामय असा भीमपलास साकारला. रागविस्तार करताना सरगमचा सौंदर्यपूर्ण वापर हेही त्यांचे वैशिष्ट्य ठरले. ‘बीरज में धूम मचाए शाम…’ या बंदिशीतून भीमपलासचा एक वेगळा रंग त्यांनी श्रोत्यांसमोर आणला. पाठोपाठ ‘जा जा रे अपने मंदिरवा…’ ही द्रुत बंदिश सादर केली. पं. भीमसेनजींनी लोकप्रिय केलेला ‘माझे माहेर पंढरी…’ हा अभंग आणि संत राघवेंद्र स्वामी यांची कन्नड भक्तीरचना सादर करून त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात विराम घेतला. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम), माऊली टाकळकर (टाळ), वैशाली कुबेर,  अनुजा भावे -क्षीरसागर यांनी तानपुरा साथ केली.

यानंतर भेंडीबाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी मुलतानी रागाने सुरुवात केली. ज्येष्ठ गायक, गुरू पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या त्या शिष्या आहेत. विलंबित एकतालातील ‘कैसे कर मन समझाऊ…’ ही डॉ. चैतन्य कुंटे यांची रचना, त्याला जोडून डॉ. अरविंद थत्ते यांनी बांधलेला तराणा त्यांनी पेश केला. हा तराणा वैशिष्ट्यपूर्ण होता. त्याची स्थाई झपतालात तर अंतरा एकतालात निबद्ध होता. त्यामुळे रसिकांना आगळा स्वरताललयीचा आनंद मिळाला. पाठोपाठ आचार्य रातंजनकर यांची त्रितालातील ‘नैना नीर झरन…’ ही बंदिश कुबेर यांनी सादर केली. प्रतापवराळी या दाक्षिणात्य रागातील ‘बरन साजन सखी…’ ही उस्ताद अमान अली खाँ यांची त्रितालातील रचना, दुर्गा रागातील द्रुत एकतालात बांधलेला त्रिवट सादर करून अनुराधा यांनी गायनाचा समारोप केला. घराण्याची शिस्त, सुरेल आवाज, तालांचे वैविध्य,  लयीचे अनेकविध पॅटर्न… यामुळे अनुराधा यांचे गायन अतिशय प्रभावी ठरले. त्यांना भरत कामत (तबला), सौमित्र क्षीरसागर (हार्मोनिअम), ओवी तेंडुलकर आणि मृद्गंधा कड (तानपुरा) यांनी साथ केली.

सवाईची चढती रंगत अधिक खुलवण्यासाठी प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी स्वरमंचावर येताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांनी राग शुद्ध कल्याण सादर केला. मोजक्या स्वरांतून रागरूप यथार्थपणे दर्शवत त्यांनी मांडणी केली. ईशान घोष यांची तबलासाथ सुरू होताच लयकारीचे वैविध्य उलगडत गेले. ११ मात्रांच्या तालातील काहीसे अनवट वादनही त्यातील माधुर्य जपल्याने रसिकांची भरभरून दाद मिळवून गेले. पाठोपाठ द्रुत त्रितालातील रचनेतून पं. रूपक कुलकर्णी यांनी ईशान घोष यांच्यासह लयीच्या नानाविध स्वराकृती साकारल्या. तबल्यासह बासरीचे सवालजवाबही दाद मिळवून गेले. सिंदुरा रागातील रचनेने रूपक कुलकर्णी यांनी समारोप केला. त्यांना जयकिशन हिंगु यांनी बासरीची साथ केली.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात मागील ३३ वर्षे प्रभावी सूत्रसंचालन करणाऱ्या आनंद देशमुख यांची दखल लंडन येथील ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’ या संस्थेच्या वतीने घेण्यात आली असून त्यांच्या या विक्रमाची नोंद आज ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये करण्यात आली. या विक्रमाचे प्रशस्तीपत्रक आणि मानचिन्ह आज मुकुंदनगर येथे सुरु असलेल्या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’चे महासंचालक विक्रम त्रिवेदी यांनी आनंद देशमुख यांना प्रदान केले. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि विश्वस्त शिल्पा जोशी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. फोटोत (डावीकडून) शिल्पा जोशी, श्रीनिवास जोशी, आनंद देशमुख आणि विक्रम त्रिवेदी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading