गायन, वादन आणि नृत्याचा ‘सवाई’च्या स्वरमंचावर त्रिवेणी संगम
मेघरंजनी मेधी यांचा खिळवून ठेवणारा कथक नृत्याविष्कार
पुणे : कंठसंगीत, वाद्यवादन आणि नृत्य असा त्रिविध कलांचा संगम शनिवारी, सवाईच्या स्वरमंचावर रसिकांनी अनुभवला. या त्रिवेणी संगमाने ‘गीतं वाद्यं तथा नृत्यं, त्रयं संगीतमुच्यते’ या उक्तीचा प्रत्ययही रसिकांना मिळाला.
सवाईच्या चौथ्या सत्राचा उत्तरार्ध प्रसिद्ध गायक डॉ. भरत बलवल्ली यांच्या गायनाने सुरू झाला. त्यांना ज्येष्ठ गायक व गुरू पं. यशवंतबुवा जोशी यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली आहे. त्यांनी राग शहाणा कानडा सादर केला. ‘मोरे आये कुवर कन्हाई…’ ही झपतालातील रचना सविस्तर मांडली. त्याला जोडून ‘मंदिरवा मै मोरे आज…’ हा द्रुत एकताल ऐकवताना, त्यांनी उत्तम दमसास, तयारीच्या तानांचे दर्शन घडवले. त्यानंतर राग शंकरामधील स्वरराज छोटा गंधर्व यांची ‘प्रथम नाद पहचानो…’ ही त्रितालातील रचना पेश केली. रात्रीचा राग ऐकवण्यात आणि तो उत्तम रंगवण्यात ते यशस्वी झाले. संगीत मानापमान नाटकातील ‘युवतिमना दारुण रण रुचिर प्रेमसे…’ हे हंसध्वनी रागातील द्रुत एकतालातील नाट्यगीत अतिशय आक्रमकपणे सादर केले. ‘हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा…’ या भक्तीरसपूर्ण रचनेने त्यांनी गायन संपवले. त्यांना रामकृष्ण करंबेळकर (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), गंभीर महाराज (पखवाज), दिगंबर जाधव आणि मुबिन मिरजकर यांनी साथ केली.
चढत्या रात्रीसोबत सवाईचा उत्तरार्धही अधिक रंगतदार करणारा व्हायोलिन आणि सरस्वती वीणा वादनाचा स्वराविष्कार रसिकांना स्वर समृद्ध करणारा ठरला. विदुषी कला रामनाथ यांचे व्हायोलिन आणि डॉ. जयंती कुमरेश यांचे सरस्वती वीणावादन, असा दुहेरी स्वरयोग राग चारुकेशीच्या माध्यमातून साधला गेला. आलाप, जोड, झाला यातून चारुकेशी रंगतदार झाला. व्हायोलिन आणि सरस्वती वीणा या दोन्ही वाद्यांना अनुकूल तालवाद्ये सोबत असल्याने राग जणु उत्तर हिंदुस्थानी आणि दाक्षिणात्य संगीत प्रवाहासोबत एकरूप होत खुलत गेला. दोन्ही कलाकारांचे वाद्यांवरील प्रभुत्व, मिंडकाम दाद मिळवून गेले. व्हायोलिन आणि सरस्वती वीणा यांच्यासोबत ज्येष्ठ तबलावादक पं. योगेश समसी आणि जयचंद्र राव (मृदंगम) यांचे सवालजवाब श्रोत्यांना आनंद देणारे ठरले. कबीर शिरपूरकर व सावनी जोशी यांनी तानपुरा साथ केली.
आसाम येथील प्रसिद्ध कथक नृत्यांगना मेघरंजनी मेधी यांचे कथक नृत्य अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले. मेघरंजनी यांचा खिळवून ठेवणारा पदन्यास, डौलदार देहबोली आणि भावोत्कट अभिनयाने रसिक मंत्रमुग्ध झाले. देवीस्तुतीने त्यांनी प्रारंभ केला. देवीची सौम्य, उग्र, दैत्यनाशिनी, असुरसंहारिणी, युद्धसन्मुख अशी रूपे तसेच देवीचे मंगल, शांत असेही रूप मेघरंजनी यांनी पदन्यास आणि अभिनयातून साकारले. त्यानंतर कथकच्या लखनौ घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे थाट, आमद, परण, टुकडे, चक्रधार व चक्कर त्यांनी विलंबित, मध्य आणि द्रुत लयीत सादर केले. कथक नृत्यातील भावपक्ष अधोरेखित करणारी कृष्णलीलाही त्यांनी साकारली.
रसिकांशी संवाद साधताना मेघरंजनी म्हणाल्या, “सवाईचा स्वरमंच नसून, हे स्वरमंदिर असल्याची माझी भावना आहे. इथे कलाविष्कार करण्याचे स्वप्न प्रत्येक कलाकार बाळगतो. मीही त्याला अपवाद नाही. आज मला इथे नृत्यप्रस्तुतीची संधी मिळाली, हे मी सौभाग्य मानते.” कथकच्या माध्यमातून कृष्णलीला पेश करताना, ‘मैया मोरी मै नही माखन खायो…’ या लोकप्रिय रचनेतून मेघरंजनी यांनी आकर्षक देहबोली, संवेदनशील, समर्थ अभिनय, रसभावदर्शन, पदलालित्य, मुद्राभिनय यांचे विलोभनीय दर्शन घडवले. त्यांना पं. जयप्रकाश मेधी (गायन आणि लेहरा), पार्थ भूमकर (पखवाज), उस्ताद फारुख लतीफ खान (सारंगी), गुरू मारमी मेधी (बोल पढंत), अमान अली खान (तबला), निलंभ दास (व्यवस्थापन) यांनी नृत्याची रंगत खुलवणारी साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
