संतूरचे सूर आणि दमदार गायनाने मिळाला श्रवणानंद
सवाईच्या तिसऱ्या दिवशीचा पूर्वार्ध संतूरवादन – गायनाने झाला रंगतदार
पुणे : युवा संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी यांचे बहारदार संतूरवादन आणि त्यानंतर श्रीनिवास जोशी यांनी रंगवलेला राग पूरिया, यामुळे सवाईच्या तिसऱ्या दिवशीचे पहिले सत्र रंगतदार झाले.
आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात सुरू आहे. शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या पूर्वार्धात सत्येंद्रसिंह सोलंकी यांच्या संतूर वादनाने रसिकांना आनंद दिला. सत्येंद्रसिंह हे पं. ओमप्रकाश चौरसिया यांचे शिष्य आहेत. त्यांनी वादनासाठी दाक्षिणात्य राग वाचस्पती निवडला होता. आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन करताना त्यांनी अगदी मोजक्या आलापीनंतर पखवाजच्या साथीने रागविस्तार केला. सत्येंद्रसिंह यांनी धृपद गायनाची तालीम प्राप्त केली असल्याने धृपद गायकीचे अंगही त्यांच्या वादनाला एक निराळा रंग देणारे ठरले.
तबल्याच्या साथीने तिस्र, चतुस्र जातीत त्यांनी वादन केले. त्यानंतर रूपक आणि त्रितालातील रचनांमधून त्यांनी लयकारीचे दर्शन घडवले. मिश्र पहाडीमधील अतिशय आकर्षक धून ऐकवून त्यांनी विराम घेतला. त्यांना रामेंद्रसिंह सोलंकी (तबला) आणि अखिलेश गुंदेचा (पखवाज) यांनी पूरक साथसंगत केली.
त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन संपन्न झाले. त्यांनी राग पूरिया मध्ये एकतालातील ‘पिया गुणवंता’ आणि त्रितालातील ‘घडिया गिनत’ या रचनांचे त्यांनी अतिशय दमदार सादरीकरण केले. त्यानंतर राग सुहा कानडा मध्ये ‘ए दाता हो…’ ही झपतालातील रचना रंगतदार होती. संत तुकाराम महाराज यांच्या ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा…’ या लोकप्रिय अभंग गायनातून वातावरण भक्तीरसपूर्ण करत त्यांनी समारोप केला. त्यांना पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (हार्मोनिअम), गंभीर महाराज (पखवाज), विराज जोशी (गायनसाथ), माऊली टाकळकर (टाळ), लक्ष्मण कोळी आणि मोबिन मिरजकर (तानपुरा) यांनी साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
