Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

आपल घर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाला सुरुवात

पुणे  : कॅन्सर या आजाराने गेलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाच्या आठवणीच्या दु:खांना कुरवाळत न बसता स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या विजय व साधना फळणीकर या दाम्पत्याने सुरु केलेली पुण्यातील आपलं घर ही स्वयंसेवी संस्था यावर्षी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. या निमित्ताने येत्या वर्षभरात पुण्याच्या आजूबाजूच्या दुर्गम भागातील २५ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती व त्यांची देखभाल करण्यासोबतच या भागात मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्याचा निश्चय संस्थेने केला आहे. यासोबतच लोककला जिवंत रहाव्यात या उद्देशाने दशावतार सारखे काही सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आज एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृह येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांनी ही माहिती दिली. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते- लेखक समीर चौघुले, त्यांच्या पत्नी कविता चौघुले, लघाटे रिअल्टर्सचे अमित लघाटे, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका मनीषा निश्चल, भाऊसाहेब जाधव, सी. डी. शेठ, आशुतोष जोशी, काही दिवसांपूर्वी १० लाख रुपयांची बॅग परत करणाऱ्या कचरावेचक अंजू माने, आपलं घर संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर, विश्वस्त साधना फळणीकर, सचिव राजेश मंडलिक आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. अंजू माने यांनी समाजाला घालून दिलेल्या प्रामाणिकपणाच्या आदर्शाचा सन्मान म्हणून समीर चौघुले यांच्या हस्ते माने यांचा विशेष सन्मानही  यावेळी करण्यात आला.

वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशनच्या अंतर्गत आपलं घर ही संस्था निराधार मुले- मुली, आजी आजोबा यांसाठी काम करते शिवाय कौशल्या कराड धर्मादाय रुग्णालयासारख्या मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालय व मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्यसेवा देखील पुरविली जाते असे सांगत विजय फळणीकर म्हणाले, “आज संस्थेमध्ये ४८ निराधार मुले- मुली आणि ११ निराधार आजी आजोबांचे संगोपन केल्या जाते. आजवर संस्थेमधून १५० हून अधिक मुले बाहेर पडत स्वत:च्या पायावर उभी राहिली असून कोणत्याही सरकारी मदतीशिवाय समाजातील दातृत्व दाखविणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने संस्थेचे काम सुरु आहे. संस्था यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून यानिमित्ताने पुण्याच्या आजूबाजूच्या दुर्गम भागातील २५ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती व त्यांची देखभाल करण्यासोबतच या भागात मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्याचा निश्चय संस्थेने केला आहे. यासोबतच लोककला जिवंत रहाव्यात या उद्देशाने काही सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे.”

पुणे शहर व परिसरातील गरजू नागरिकांना अत्यल्प दरात आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच आजूबाजूला असलेल्या दुर्गम भागात मोबाईल मेडिकल युनिट आणि हॉस्पिटल ऑन व्हील्स मेडिकल हेल्थ कॅम्प सारख्या उपक्रमाद्वारे अधिक सक्षमपणे संस्थेच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविली जाते असेही फळणीकर यांनी सांगितले. चित्रा खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर राजेश मंडलिक यांनी प्रास्ताविकामध्ये आपलं घर या संस्थेबद्दल माहिती दिली. यानंतर प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक समीर चौघुले यांचा ‘सम्या सम्या मैफलीत माझ्या…’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading