सेवा, कर्तव्य, त्याग फुटबॉल स्पर्धेचे ९ डिसेंबरपासून आयोजन !!
पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागा तर्फे आदरणीय काँग्रेस पक्षनेत्या श्रीमती सोनियाजी गांधी व मा.आ. मोहनदादा जोशी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने ‘सेवा, कर्तव्य, त्याग’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ९ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत डोबरवाडी येथील पीडीएफए फुटबॉल मैदानावर होणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अबीसी विभागाचे अध्यक्ष आणि पीडीएफएचे सचिव प्रदीप परदेशी यांनी सांगितले की, या खुल्या गटाच्या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले आहेत. य स्पर्धेचे उद्दीष्ट खेळाडूंमध्ये शारीरिक तंदुरूस्ती, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणे तसेच नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. काँग्रेस पक्षाच्या सेवा, कर्तव्य आणि त्याग या मुल्यांना प्रतिबिंबित करणारी ही स्पर्धा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला.
स्पर्धेत जायंट्स, आयएफा, नॉईज बॉईज, दुर्गा एफसी, व्हॅली हंटर्स, न्यु इंडिया सॉकर, नवमहाराष्ट्र संघ, इंद्रायणी एफसी, परशुरामियन्स्, आर्यन्स् क्लब, इन्फाट्स, स्पोर्ट्स मेनिया, घोरपडी तामिळ युनायटेड, एफसी शिवनेरी, हायलँडर, युनिक वानवडी, स्कॉय हॉक्स्, केपी इलेव्हन, पुणेरी वॉरीयर्स, घोरपडी यंग वन्स् आणि जीओजी एफसी यासारखे ३२ संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात येणार आहेत. तसेच सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल करणारा खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना जायंट्स आणि आयएफा या दोन संघांमध्ये होणार आहे.
