‘देवराई ही सामूहिक लोकनीती’; निसर्गाच्या शाश्वततेसाठी लोकसहभाग आवश्यक – डॉ. माधव गाडगीळ
पुणे : भारतातील विविध भूभागावरील विविध जाती-धर्मातील लोकं देवराई मानतात. विविध धर्मात देवराईंचे महत्व वेगळ्या पद्धतीने सांगितले आहे. अनेक लाभ असल्याने देवराई जपली जाते. औषधी वनस्पतींसह विविध प्राणी आणि प्रजातींचे आश्रयस्थान हे देवराई आहे, आणि या आश्रयस्थानांमुळेच निसर्गाचे जतन होत आहे. देवराई ही केवळ धार्मिक परंपरा नसून निसर्गाची शाश्वतता जपणारी सामूहिक लोकनीती असल्याचे मत डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. डॉ. माधव गाडगीळ यांनी देवराई बद्दलच्या अनेक संकल्पना मांडल्या. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक जाणीव यांच्या आधारावर पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या देवरायांमुळे जैवविविधतेचा अनमोल ठेवा सुरक्षित राहिला; मात्र शहरीकरण, अतिक्रमण आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक देवराया संकटात आल्या असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. देवरायांचे पुनरुज्जीवन आणि नव्या देवरायांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करून या कार्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला.
वनराईचे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया आणि ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. वामन वर्तक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी ‘शाश्वत देवराई’ या विषयावरील वनराई संस्थेच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. जेष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ, विज्ञान संशोधक व लेखक डॉ. मिलिंद वाटवे, भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक, वनराईचे विश्वस्त सागर धारिया आणि सचिव व कार्यकारी संपादक अमित वाडेकर यांच्या उपस्थितीत विशेषांकाचे प्रकाशन झाले.
डॉ. मोहन धारिया यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक अमित वाडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रिया महाबळेश्वरकर यांनी आणि आभारप्रदर्शन सुजाता मुळ्ये यांनी केले.
डॉ. मिलिंद वाटवे म्हणाले की, निसर्गाचा अभ्यास करायचा असल्यास मानवाचा अभ्यास प्रथम केला पाहिजे. माणूस समजणे अवघड आहे. मानवाने शेती करण्यापूर्वी आणि नंतर अनेक प्रजाती नष्ट झाल्या. याच मानवाने विध्वन्स केला आणि निसर्ग राखला देखील. जिथे देवराई होती तिथे निसर्ग राखला गेला तर जिथे नव्हती तिथे विध्वंस झाला.
वनराईचे विश्वस्त सागर धारिया यांनी “प्रत्येक गावात, प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक हृदयात एक देवराई रूजावी, हे आमचे स्वप्न आहे,” असे सांगत सर्वांच्या सहभागातून ‘हरित भारत’ साकार करण्याचे आवाहन केले.
कार्यकारी संपादक अमित वाडेकर यांनी देवराई संकल्पनेतील सांस्कृतिक मुळांचा, तिच्या पर्यावरणीय भूमिकेचा आणि आधुनिक काळातील संवर्धनाच्या गरजेचा वेध घेतला असून, “देवराया शाश्वत राखायच्या असतील तर आपण स्वतः त्या शाश्वततेचे वाहक बनले पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात डॉ. मोहन धारिया यांच्या ‘निसर्ग आणि मानवाचे अतूट नाते’ या चिंतनात्मक लेखाचे अंशही वाचनासाठी उपलब्ध करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
१९८०च्या दशकात सुरू झालेल्या वनराईच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामविकास चळवळीने दुष्काळी गावांपासून आदिवासी भागांपर्यंत पाणी, जंगल, जमीन आणि जैवविविधता जपण्याचा व्यापक प्रयत्न केला. गेली साडेतीन दशके ‘वनराई’ मासिकाने पर्यावरणप्रेमाची भावना समाजात दृढ करण्याचे कार्य केले आहे. दरवर्षी महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाशित होणारा वार्षिक विशेषांक यंदा ‘शाश्वत देवराई’ या विषयावर आधारित असून देवरायांच्या सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्वाचा सखोल आढावा त्यात मांडण्यात आला आहे.
वनराईने पुणे जिल्ह्यातील मुखई आणि नाशिकमधील पहिने या गावांत मानवनिर्मित देवराई या संकल्पनेचा पथदर्शी उपक्रम सुरू केला असून तो विस्तारत जाण्याची अपेक्षा या कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आली. विशेषांकात देवरायांवर प्रदीर्घ संशोधन केलेल्या तज्ज्ञांचे अनुभव, अभ्यासपूर्ण लेख आणि संवर्धनाच्या विविध पद्धतींचा ऊहापोह मांडण्यात आला आहे. स्थानिक समुदाय, देवस्थान समित्या, सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायतींसाठी हा विशेषांक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
