Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

नागपूरचाळ, फुलेनगर प्रभाग दोनचा आश्वासक चेहरा – महेश पाटील

 

पुणे: सामाजिक कार्यातून नाव कमावून युवकांच्या मनात स्थान मिळवलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) गटाचे शहर उपाध्यक्ष महेश पाटील यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन, नागपूरचाळ–फुलेनगरमधून उमेदवारीसाठी दंड थोपटले असून त्यांच्या मैदानात उतरल्याने या भागात ‘युवा पर्वा’चा नवा अध्याय सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या एंट्रीमुळे विरोधकांच्या ‘गर्वाला’ उतराई मिळेल, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने अनेक इच्छुक नेत्यांमध्ये संथता आली होती. मात्र न्यायालयीन आदेशानंतर राजकीय वातावरण तापले असून, विशेषतः फुलेनगर-नागपूरचाळ हा प्रभाग प्रतिष्ठेचा बनला आहे. या भागात यापूर्वी एकतर्फी निवडणुका होत असत; परंतु आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या तालमीत राजकारणाचे धडे घेतलेले महेश पाटील हे ‘विरोधकांना कात्रजचा घाट दाखविण्यास’ सज्ज असल्याचे पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.

महेश पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी समाजकारणावर भर दिला. गोरगरीब, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांच्या समस्यांवर उपाय शोधत त्यांनी समाजाशी घट्ट नाते बांधले. त्यांच्या कार्यामुळेच अजितदादा पवार यांनी नागपूरचाळ परिसरात उभारलेल्या त्यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांचे काम प्रत्यक्ष पाहिले — हे स्थानिक पातळीवर त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक ठरले आहे.

बेरोजगार युवकांचा आधारवड

महागाई व बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी माथाडी संघटनेचा पाया रचून शहरातील हजारो युवकांना रोजगार मिळवून दिला. आज ही संघटना राज्यभर पसरली असून, अनेक युवकांच्या आयुष्यात स्थैर्य आणले आहे. या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

विकासकामांची सातत्याने पाठपुरावा

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या सहकार्याने पाटील यांनी प्रभागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ड्रेनेज आदी अनेक रखडलेली विकासकामे पूर्णत्वास नेली. तसेच महिलांना स्वावलंबनासाठी महिला बचत गट, व्यावसायिक कोर्सेस आणि लघुउद्योगांत सहभागी करून घेत रोजगार निर्मितीचे कार्यही त्यांनी केले आहे.

साम्राज्य प्रतिष्ठानचे सामाजिक योगदान

‘साम्राज्य प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत शिक्षण, आरोग्य, संस्कृती, धार्मिक कार्य आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जातात. गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, बेरोजगार युवकांना नोकरीची जोडणी, सण-उत्सवांमध्ये अन्नदान, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता मोहिमा — अशा अनेक उपक्रमांद्वारे संस्था सतत कार्यरत आहे. या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘दैनिक महा मेट्रो’ तर्फे पाटील यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी सदैव उपलब्ध नेता

‘काम तुमचं, जबाबदारी आमची’ या ब्रीदवाक्याखाली साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पाटील हे पद नसतानाही नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास तत्पर राहिले आहेत. कोणतेही शासकीय अथवा महानगरपालिकेचे काम असो, पाटील नागरिकांसाठी नेहमी पुढे असतात.

प्रभागातील नागरिक, युवक आणि महिला वर्गात त्यांचा वाढता प्रभाव पाहता नागपूरचाळ–फुलेनगर प्रभागाच्या राजकारणात महेश पाटील हे आश्वासक आणि प्रभावी चेहरा म्हणून उदयास आले आहेत. आगामी निवडणुकीत ते या भागातील मतदारांच्या अपेक्षांचा नवा चेहरा ठरतील, अशी जनतेत चर्चा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading