रोहित पवार यांनी निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिला – राम शिंदे यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
गुंड निलेश घायवळ याला मदत केल्याचे रोहित पवार यांनी आपल्यावर केलेले आरोप हा शुद्ध खोटारडेपणा असून रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणून निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळवून दिला, असा आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
निलेश घायवळ आणि राम शिंदे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपावर प्रा. शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. रोहित पवार यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उलट रोहित पवार आणि गुंड घायवळ यांचे कौटुंबिक संबंध आहेत, असा दावा प्रा. शिंदे यांनी केला. आपल्याला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रोहित पवार घायवळ याला मतदारसंघात घेऊन आले. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींवर निलेश आणि त्याचा भाऊ सचिन यांच्यामुळे विजय मिळाल्याचा उल्लेख पवार यांनी केल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांची एकत्र छायाचित्रही प्रसिद्ध झाली आहेत. आता पवार आणि घायवळ यांच्यात कोणत्या आर्थिक कारणाने मतभेद झाले ते माहित नाही, असेही प्रा. शिंदे म्हणाले.
सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासाठी प्रा. राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर दबाव आणल्याचा रोहित पवार यांचा आरोपही प्रा. शिंदे यांनी नाकारला. योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री म्हणून काही अधिकार आहेत. त्यानुसार ते योग्य पद्धतीने काम करत आहेत, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि आपण गृहराज्यमंत्री असताना निलेश घायवळ याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला त्यातून सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी मदत केली, असा आरोप करतानाच आपला आणि घायवळ याचा कोणताही संबंध नाही, असे प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.
