Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सत्ताधारी पक्ष अनेक बाबींचे सोंग करत आहेत ते उघडे पाडण्याची जबाबदारी पुरोगामी संस्था, नागरिकांची – डॉ. परिमल माया सुधाकर

पुणे : देशातील गरिबांसाठी कल्याणकारी योजना, अनुदान देण्यास विरोध करणारे प्रतिगामी विचारांचे सरकार मागील 11 वर्षांपासून देशात सत्तेवर आहे. या पक्षाच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही, राष्ट्र बांधणी आणि निर्मिती मध्ये त्यांचे योगदान शून्य आहे, आता हेच लोक निवडणुकीतील मतांसाठी लाडकी बहीण किंवा बिहार मध्ये 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये जमा करत आहेत. सत्ताधारी पक्ष अनेक बाबींचे सोंग करत आहेत ते उघडे पाडण्याची जबाबदारी पुरोगामी संस्था, नागरिकांची आहे असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. परिमल माया सुधाकर यांनी व्यक्त केले. 

एस. एम. जोशी सभागृहात भाई वैद्य फौंडेशन व आरोग्य सेना यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘ पुरोगामी जनगर्जना’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. परिमल माया सुधाकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई वैद्य फौंडेशन व आरोग्य सेनाचे अध्यक्ष  डॉ. अभिजित वैद्य होते. 

पुढे बोलताना डॉ. परिमल माया सुधाकर म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी पक्ष हा भारतीय वाटवृक्षावरील एक परावलंबी वेल आहे, कारण त्यांनी कधीही राष्ट्र निर्मिती, बांधणी यांचा विचार केला नाही. काही महिन्यांपर्यंत देश विश्वगुरु होणार अशी शेखी हे लोक मिरवत होते मात्र मागील काही घटनांवरून  आपल्याला समजले की देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वजन घटले असून सातत्याने नेहरूंच्या नावाने खडे फोडणारे नेते प्रत्यक्षात त्यांनी दिलेले परराष्ट्र धोरण राबवत आहेत. 

आज देशात विकासाच्या नावाखाली पर्यावरण ऱ्हास आणि काही ठराविक उद्योगपतींचे भले करण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका करताना डॉ. परिमल माया सुधाकर म्हणाले,  भौगोलिक घटकांचा विचार न करता अनियंत्रित विकास कामे, शहरीकरण होत असल्याने सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत, पर्यावरण पूरक विकासाचे धोरण आखणे गरजेचे आहे मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 

ऑपरेशन सिंदूर मध्ये कर्नल सोफिया यांना मीडिया समोर आणि पर्यायाने जगासमोर आणत आम्ही धर्मनिरपेक्ष असल्याचे चित्र या सत्ताधारी लोकांनी निर्माण केले, कल्याणकारी योजना सामान्य लोकांच्या विकासासाठी राबवल्या जात आहेत, सुरुवातीपासून आरक्षणाला विरोध करणारे आज सत्ता टिकवण्यासाठी आरक्षण धोरण राबावत आहेत तसेच जातिनिहाय जनगणानेला मान्यता देत आहेत हा खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचा विजय असल्याचेही डॉ. परिमल माया सुधाकर यांनी नमूद केले. 

अध्यक्षीय भाषणात डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले,  राज्यशास्त्रात किंवा जगात कुठेही आदर्श राज्य, आदर्श राष्ट्र यांची परिपूर्ण व्याख्या अस्तित्वात नाही. जग हे यूटोपिया आणि डिस्टोपिया अशा विचारात विभागलेले आहे.  त्यातील डिस्टोपियावर आपला ‘ पुरोगामी जनगर्जना’ दिवाळी अंक भाष्य करतो.  आज विकासाच्या नावाखाली जो विध्वंस सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, सत्ताधारी नेते बोलताना संविधान, महिला धोरण याच्या बाता मारताना दिसत आहेत परंतु त्यांचे कार्यकर्ते अगदी या विरुद्ध वाटचाल करताना दिसत आहेत यामुळे या सत्ताधारी लोकांपासून सावध राहण्याची आणि त्यांच्या नेत्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय हे सामान्य जनतेला समजून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट शेलकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रमोद दळवी यांनी तर अॅड. संतोष मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading