कोणाच्याही तोंडचा घास काढून इतरांना देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर: प्रतिनिधी
आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि इतर मागासवर्गीय यांच्यात तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणाच्याही तोंडचा घास काढून इतरांना देणार नाही, अशा शब्दात स्पष्टीकरण दिले आहे. समाजा समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य टाळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे सुलभ व्हावे यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे या निर्णयावर तीव्र नाराज असून त्यांनी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाई लढण्याची तयारी केली आहे. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, कोणताही निर्णय घेतला तरी त्याला दोन बाजू असतातच. दुसऱ्या बाजूने त्यावर टीका होतच असते.
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन आदेश काढला त्यावेळी चर्चा वेगळी होती नंतर चर्चा बदलत गेली, असे पवार यांनी स्पष्ट केले. आपल्याला कोणत्याही समाज घटकाला नाराज करायचे नाही, असेही त्यांनी सांगितले.
हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाचा समावेश आदिवासींमध्ये केला जावा, अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी आंदोलने देखील सुरू आहेत. याबाबत बोलताना पवार यांनी अनुसूचित जाती आणि जमाती यामध्ये कोणत्याही समाजाला समाविष्ट करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. राज्य सरकार त्यात काहीही ढवळाढवळ करू शकत नाही, असे पवार यांनी सांगितले.
… म्हणून सोडली शरद पवारांची साथ
आपण कोणत्याही सत्ता किंवा पदासाठी शरद पवार यांची साथ सोडून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही. केवळ महाराष्ट्राला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे पवार यांनी स्पष्ट केले.
