वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा व्हिएतनाममधील व्हिएत खान ग्रुपसोबत 100 मेगावॉट पी सोलार ईपीसी टर्नकी प्रकल्पासाठी सामंजस्य करार
मुंबई : वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि व्हिएत खान जॉइंट स्टॉक कंपनी यांनी व्हिएतनामच्या डॅकलॅक प्रांतातील कु मगार जिल्ह्यातील ईए म्ड्रॉड कम्युन येथे 100 मेगावॉट पी क्षमतेच्या फोटोपवोटिक सौरऊर्जा प्रकल्पासाठी टर्नकी ईपीसी (इंजिनीअरिंग, प्रोक्युअरमेंट अँड कन्स्ट्रक्शन) कामे राबविण्यासाठी एक अनबाइंडिंग सामंजस्य करार (MoU) केला आहे. ही धोरणात्मक भागीदारी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, 2019 मध्ये कॅम रॅन प्रांतात 49.5 मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णतेनंतर वारी समूह आणि ग्राहक यांच्यातील दुसरे महत्त्वाचे सहकार्य आहे.
या सामंजस्य कराराचा उद्देश वारी आणि प्रकल्पाच्या मालक यांच्यातील मजबूत व्यावसायिक नातेसंबंध व परस्पर विश्वास अधोरेखित करणे हा आहे. या करारांतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी डिझाइन, अभियांत्रिकी, बांधकाम, चाचणी आणि प्रकल्पाची राष्ट्रीय विद्युत ग्रीडशी यशस्वी जोडणी यांचा समावेश आहे.
हा प्रकल्प म्हणजे 2018–19 मध्ये वारी समूहाने यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या 49.5MW सौरऊर्जा प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार आहे, जो आज व्हिएतनाममधील सर्वोत्तम कार्यक्षमतेने चालणाऱ्या सौर प्रकल्पांपैकी एक मानला जातो. वारीच्या अभियांत्रिकीतील उत्कृष्टता आणि दीर्घकालीन विश्वासार्ह कामगिरीमुळे मिळालेला विश्वास हा 100MWp क्षमतेच्या या महत्त्वपूर्ण विस्ताराचा भक्कम पाया ठरला आहे.
“वारी समूहाने 2018–19 मध्ये पूर्ण केलेला 49.5MW क्षमतेचा सौर प्रकल्प आजतागायत व्हिएतनाममधील सर्वाधिक कार्यक्षम सौर प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. ही अपवादात्मक कामगिरी आणि व्यावसायिकता आमच्या नव्या विश्वासाचा भक्कम पाया ठरली आहे. आम्ही वारीसोबतचा आमचा सहयोग पुढील 100MWp प्रकल्पासाठी विस्तारत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे आणि या प्रदेशातील सर्वात कार्यक्षम स्वच्छ ऊर्जा मालमत्ता उभारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे व्हिएत खान जॉइंट स्टॉक कंपनीचे अध्यक्ष श्री. दिन्ह झुआन हाय सॅंग यांनी सांगितले.
“हा 100MWp सौर प्रकल्प ही एक महत्त्वाची टप्पा ठरणारी भागीदारी असून, व्हिएत खानसोबतची आमची भागीदारी अधिक दृढ करत असल्याचा आम्हाला सन्मान वाटतो. वारी समूहाची जागतिक पातळीवर उच्च कार्यक्षम, बँकेबल सौर पायाभूत सुविधा पुरविण्याची ख्याती या सहकार्याच्या माध्यमातून अधोरेखित होते. गुणवत्ता, शाश्वतता आणि ऊर्जा संक्रमणाबाबत आमची वचनबद्धता व्हिएतनामच्या राष्ट्रीय ऊर्जा दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे,” असे वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री. विरेन दोशी यांनी सांगितले.
हा प्रकल्प हे दर्शवितो की, जागतिक स्तरावरील भागीदाऱ्या कशा प्रकारे आग्नेय आशियामधील शाश्वत ऊर्जा संक्रमणाला गती देऊ शकतात. भारतातील सर्वात मोठा सौर मॉड्युल निर्माता असलेल्या वारीने आतापर्यंत 20GW पेक्षा अधिक क्षमतेची सौर मॉड्युल्स 20 हून अधिक देशांमध्ये वितरित केली आहेत. मॉड्युल उत्पादनापासून ते EPC अंमलबजावणीपर्यंतची संपूर्ण तांत्रिक क्षमता वारीकडे असून, ही क्षमता आता व्हिएतनामच्या सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या प्रांतांपैकी एकामध्ये उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात वापरली जाणार आहे.
हा पुढाकार दोन्ही देशांच्या अक्षय ऊर्जा लक्ष्यांना गती देणारा आहे. हा प्रकल्प व्हिएतनामच्या PDP8 रोडमॅपला पाठिंबा देतो, जो 2030 पर्यंत 30.9% अक्षय ऊर्जा हिस्सा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवतो. याचबरोबर, भारताच्या “Act East Policy” शी सुसंगत असून, स्वच्छ तंत्रज्ञान आणि हवामान बदल उपाययोजनांचा जागतिक निर्यातदार म्हणून भारताच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देतो.
प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, 100MWp सौरऊर्जा प्रकल्प दरवर्षी सुमारे 1,30,000 मेट्रिक टन CO₂ उत्सर्जन टाळण्यास मदत करेल, जे दरवर्षी 20 लाखांहून अधिक झाडे लावणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प केवळ जीवाश्म इंधनांवरील अवलंबन कमी करत नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारतो, जैवविविधतेचे संरक्षण करतो आणि ग्रामीण व निमशहरी व्हिएतनाममध्ये स्वच्छ ऊर्जा विस्तारासाठी एक प्रमाणभूत मॉडेल म्हणून काम करतो.
ही भागीदारी हे दर्शवते की, उदयोन्मुख अर्थव्यवस्था नवकल्पना, धोरणे आणि गुंतवणूक यांची सांगड घालून हवामान बदलाचा सामना करतानाच आर्थिक वाढ व ऊर्जा प्रवेशही सुनिश्चित करू शकतात.
