Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

मंगला खाडिलकर यांना दुसरा कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार जाहीर

पुणे : पुण्यातील सृजन फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध निवेदिका, लेखिका म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या मंगला खाडिलकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून येत्या २६ व २७ जून रोजी टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवात सदर पुरस्कार खाडिलकर यांना प्रदान करण्यात येईल, अशी माहिती महोत्सवाचे मुख्य आयोजक असलेल्या अधीश पायगुडे यांनी कळविली आहे. या आधी ज्येष्ठ व्हायोलिनवादक गुरु पं. अतुलकुमार उपाध्ये यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

मराठी शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीत क्षेत्रातील एक असामान्य कलाकार म्हणून आपण सर्व जण गायिका ज्योत्स्ना भोळे यांना ओळखतोच. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला मानवंदना देण्याकरिता पुण्यातील सृजन फाऊंडेशन आणि नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २६ जून व शुक्रवार दि. २७ जून रोजी १४ व्या ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून गेली अनेक वर्षे महोत्सवाचे यशस्वी आयोजक करणाऱ्या कै. प्रकाश पायगुडे यांच्या स्मृतीनिमित्त सदर पुरस्कार फाऊंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. निवेदिका, लेखिका मंगला खाडिलकर यांना यावर्षी दुसरा कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व रुपये दहा जार एक रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, असेही पायगुडे यांनी यावेळी सांगितले.


याशिवाय महोत्सवादरम्यान शास्त्रीय संगीताचे पूर्णवेळ शिक्षण घेणाऱ्या आकाश नाईक आणि स्वप्नील सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती देखील प्रदान करण्यात येईल, असेही पायगुडे म्हणाले. प्रत्येकी अकरा हाजार रुपये रोख असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.   

दोन सत्रांमध्ये संपन्न होणाऱ्या ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाच्या पहिल्या दिवशी (गुरुवार २६ जून | सायं ५ वाजल्यापासून) महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन होईल. यानंतर पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शिष्य असलेले एस. आकाश (बासरी) आणि पं. मिलिंद रायकर याचे शिष्य असलेले यज्ञेश रायकर (व्हायोलिन) यांची बासरी व व्हायोलीन जुगलबंदी रंगेल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२७ जून | सायं ५ वाजल्यापासून) शास्त्रीय संगीतातील तीन घराण्यांचा संगम साधणाऱ्या ‘परंपरा’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. यामध्ये कुमार गंधर्व यांच्या कन्या विदुषी कलापिनी कोमकली, किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी आणि पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी आपल्या घराण्याची गायकी रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील. मंगला खाडिलकर या दोन्ही दिवशी महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading