Wednesday, October 28, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

योग हे मानवतेला एकत्र बांधणारे प्रभावी साधन – नरेंद्र मोदी

विशाखापट्टणम: वृत्तसंस्था 

सध्या जगात सर्वत्र अशांतता पसरलेली असताना योग हे मानवतेला एकत्र बांधणारे प्रभावी साधन आहे. योग सर्वांसाठी असून ती एक जीवनशैली आहे. योगामुळे जगात शांतता प्रस्थापित होण्याची आशा असून योगाला एक जन आंदोलन बनवूया, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. 

योग हा माणसाला तणावातून शांततेकडे घेऊन जातो. योग हे जनआंदोलन बनले तर प्रत्येक जण दिवसाची सुरुवात योगाने करेल. योगाचे जन आंदोलन जगाला शांतता, समरसता आणि आरोग्यपूर्ण जीवनाकडे घेऊन जाईल. या आंदोलनामुळे समाज एकत्र येईल. योग हा मानवतेला एका सूत्रात बांधण्याचे काम करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

दशकापूर्वी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जावा, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तब्बल 173 देशांनी पाठिंबा दिला. सध्याच्या काळात असा पाठिंबा मिळणे ही सामान्य बाब नाही. हा पाठिंबा केवळ एक दिवस साजरा करण्यासाठी नव्हता तर संपूर्ण जगाने मानवतेच्या भल्यासाठी घेतलेला हा निर्णय होता, असे मोदी म्हणाले. 

नरेंद्र मोदी लठ्ठपणा ही एक जागतिक समस्या झाली असून तो टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या आहारातील तेलाचा वापर किमान दहा टक्क्यांनी कमी करावा. योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवणे त्यासाठी देखील आवश्यक आहे, असेही मोदी यांनी निदर्शनास आणून दिले. 

Leave a Reply