Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

गायन-वादनाच्या सुश्राव्य मैफलींनी बहारदार झाला सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव

रसिकांनी अनुभवले सतार, बासरी, सारंगी, तबल्यासह कंठसंगीताचे वैविध्य

पुणे :  भारतीय अभिजात संगीत परंपरेतील विविध वाद्ये आणि कंठसंगीताच्या वैविध्यपूर्ण सुश्राव्य सादरीकरणांचा अनुभव रसिकांनी ७ व्या उस्ताद बाले खान स्मृती संगीत महोत्सवाच्या निमित्ताने घेतला. सतार, बासरी, सारंगी, तबल्याचे एकल तसेच सहवादनाचे आविष्कार या महोत्सवात रंगले आणि गायनाचे विविध रंगही रसिकांची दाद मिळवणारे ठरले.

पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सव १४ व १५ जून रोजी रसिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून सदर महोत्सव एरंडवणे येथील गणेशनगरमध्ये डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न झाला.

यावर्षीचा महोत्सव पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांना समर्पित करण्यात आला होता. ख्यातनाम सतारवादक उस्ताद उस्मान खान, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कन्नड संघाच्या अध्यक्षा मालती कलमाडी, उपाध्यक्षा इंदिरा सालीयान, पं. विजय कोपरकर, पं. राजेंद्र कुलकर्णी, पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. अरविंदकुमार आझाद, पंडित सुधाकर चव्हाण, महोत्सवाचे आयोजक प्रसिद्ध सतारवादक रईस बाले खान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात झाली. किराणा घराण्याचे आश्वासक गायक असलेल्या विराज यांनी यावेळी राग पटदीप ची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी धन धन भाग ही विलंबित एकतालातील बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी ‘पिया नही आये…’ हा तीन तालातील छोटा ख्याल सादर केला. यानंतर त्यांनी राग बसंत मुखारी गायला. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या सुप्रसिद्ध भजनाने त्यांनी समारोप केला. अभिजित बारटक्के (तबला) व पं. अविनाश दिघे (संवादिनी) यांनी यावेळी साथसंगत केली.

त्यानंतर उस्ताद रफिक खान यांची सतार आणि उस्ताद साबीर सुलतान खान यांच्या सारंगीवादनाची मैफल रंगली. त्यांना यशवंत वैष्णव यांनी तबल्याची ढंगदार साथ केली. या दोन्ही वादकांनी राग वाचस्पती सादर केला. आलाप, जोड, झाला या पारंपरिक क्रमाने त्यांनी राग उलगडत नेला. विलंबित तीनतालातील रचनेसह गतवादनही त्यांनी सादर केले. सतार आणि सारंगीचे सुरेल स्वर रसिकांची दाद मिळवून गेले.

पहिल्या सत्राचा समारोप उस्ताद अक्रम खान आणि त्यांचे सुपुत्र झरगम खान यांच्या तबला सहवादनाने झाला. अजराडा घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कलाकारांनी तीन ताल पेश केला. विविध कायदे, टुकडे, पेशकार…अशी त्यांची प्रस्तुती टाळ्यांच्या कडकडाटाने रंगत गेली. त्यांना निलय साळवी यांनी लेहेरासाथ केली.

दुसर्या दिवशीचे सकाळचे सत्र प्रसिद्ध गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने स्मरणीय ठरले. त्यांनी राग बिलासखानी तोडी मध्ये ‘नीके घुंगरिया…’ आणि पं. कुमार गंधर्व रचित तराणा सादर केला. त्यानंतर राग कुकुभ बिलावल मध्ये झपतालातील रचना आणि राग अल्हैय्या बिलावल मध्ये “कवन बटरिया…’ ही बंदिश सादर केली. लोकसंगीतसदृश रचनेने त्यांनी सांगता केली. त्यांना प्रशांत पांडव (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी अनुरूप साथ केली.

त्यानंतर प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन झाले. त्यांनी राग कोमल रिषभ आसावरी मध्ये विलंबित एकतालात ‘रब मेरा…’ ही बंदिश आणि त्रितालात ‘मै तो तुमरा दास…’ ही रचना सादर केली. राग ललित भटियार मधील हे करतार, तसेच राग जौनपुरी मध्ये त्रितालातील ‘पायल की झनकार…’ ही बंदिश पेश केली. ‘नैना रसीले…’ ही मिश्र खमाजमधील ठुमरी, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’ तसेच एक भक्तीरचना आणि ‘जो भजे हरी को सदा…’ ही भक्तिरचनाही सादर करत त्यांनी सांगता केली. त्यांना ऋषिकेश जगताप (तबला) आणि अदिती हरगडे (हार्मोनिअम) यांनी साथ केली.

महोतस्वाच्या तिसर्या आणि अखेरच्या सत्राची सुरवात धनंजय हेगडे यांच्या गायनाने झाली.  त्यांनी राग मिया मल्हार मध्ये विलंबित एकतालात करीम ‘नाम तेरो हा ख्याल….’ तसेच ‘कहे लाडली…’ ही बंदिश प्रस्तुत केली. त्यानंतर राग गावती मध्ये आस लगी गुरू दरसन की ही त्रितालातील रचना आणि मोहे मत रोको सैया ही बंदिश गायिली. कानडी भजन सादर करून त्यांनी विराम घेतला. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) यांनी साथ केली.

यानंतर स्वरमंचावर पं. रूपक कुलकर्णी (बासरी) आणि उस्ताद शफिक खान (सतार) यांचे आगमन झाले. त्यांना तबल्यावर साथ करण्यासाठी उस्ताद अक्रम खान आणि त्यांचे सुपुत्र झरगम खान होते. बासरी आणि सतार अशी संगत राग यमन मध्ये उत्तरोत्तर खुलत गेली. थोडा वेळ एकल वादन आणि नंतर विलक्षण रंगलेले सहवादन, आणि तबल्याच्या साथीने रंगलेले सवालजबाब, यातून एक विलक्षण स्वरानुभव रसिकांना मिळाला.

महोत्सवाच्या सांगतेच्या मैफलीसाठी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे देशपांडे टाळ्यांच्या कडकडाटात स्वरमंचावर आल्या. तेव्हा सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अश्विनीताईंचा पद्मश्री सन्मान प्राप्त झाल्याबद्दल अतिशय हद्य असा सत्कार करण्यात आला. अश्विनीताईंनी राग बिहाग ने मैफलीला सुरवात केली. विलंबित त्रितालात ‘बाजे री मोरी पायल झनन…’ हा ख्याल, त्याला जोडून ‘लट उलझी सुलझा जा बालमा…’ ही बंदिश आणि द्रुत त्रितालातील तराणा त्यांनी सादर केला. त्यानंतर रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी राग मेघमल्हार मध्ये झपतालातील ‘गरजे घटा घन…’ आणि /मेघश्याम घनश्याम…’ ही स्वरचित बंदिश गायिली. कबीरांची रचना भैरवी रागात प्रस्तुत करून त्यांनी अतिशय रंगलेल्या या गायनाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर ( हार्मोनिअम) तसेच श्रृती अभ्यंकर आणि ऐश्वर्या कडेकर यांनी तानपुरा व स्वरसाथ केली. महोत्सवाचे सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले तर सुमित रेखी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading