Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

मुक्तांगण आणि नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ

    पुणे : अरण्येश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर आर काबिल व निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने दोन्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन नुकतेच झाले.

    यावेळी आर आर ग्लोबल च्या संचालिका किर्ती काबरा, सेफ पॅक इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर व सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापडिया, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे विश्वस्त अतुल लाहोटी यांच्या हस्ते दोन्ही जलकुंभांचे उद्घाटन झाले. यावेळी महेश सोमाणी, शामसुंदर मुंदडा, ओमप्रकाश गटांनी, रमेश लाहोटी, रामगोपाल चांडक, प्रसाद बजाज, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी, सचिव दुर्गेश चांडक आदी उपस्थित होते.

    आर आर काबिल कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम पार पडला. आर आर ग्लोबल च्या संचालिका किर्ती काबरा यांच्या दूरगामी विचारसरणीने आणि नेतृत्वाने अनेक समाज कल्याण कार्यक्रम देशभरातील विविध भागात राबविण्यात येत आहेत. त्यातील पुण्यातील हा उपक्रम निरंजन सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पार पडला. अरण्येश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थ्यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.

    किर्ती काबरा म्हणाल्या, पिण्याचे स्वच्छ पाणी हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. तो सर्व विद्यार्थ्याना मिळायला हवा. त्यामुळे आम्ही या प्रकल्पामध्ये सहभागी झालो. यापुढे देखील अशा प्रकारचे प्रकल्प गरजू शाळेत राबविले जातील. पाण्याचा एक प्रकल्प आहे, मात्र शैक्षणिक आणि कौशल्य विकास अंतर्गत आम्ही काम करीत आहेत. रोशनी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात ५ शहरांत हे काम सुरु आहे. देशाच्या उत्थानासाठी आम्ही कौशल्य विकास अंतर्गत कार्यरत आहोत.

    लाहोटी म्हणाले, आत्ता शाळांमध्ये जलकुंभ देताना शाळेची गरज पाहून मदत दिली जाते. आजपर्यंत २८ शाळांना जलकुंभ सुविधा देण्यात आली असून निरंजन संस्थेचे हे कार्य स्पृहणीय आहे. पिण्याचे पाणी शुद्ध व स्वच्छ असणे गरजेचे असून अनेक शाळांमध्ये ही सुविधा नाही. याकडे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात कार्य व्हायला हवे.

    तापडिया म्हणाल्या, मागील १० वर्षात समाजात विविध क्षेत्रात निरंजन सेवाभावी संस्था मदत देत आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत स्तुत्य असून भविष्यात होणाऱ्या शैक्षणिक कार्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Discover more from Maharashtra Lokmanch

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading