Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

जय परशुराम… च्या जयघोषात मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा

पुणे : भगवान परशुराम की जय… जय परशुराम.. सियावर रामचंद्र की जय.. जय श्रीराम… च्या जयघोषात आणि ढोल-ताशा, टाळ-मृदूंगाच्या गजरात हिंदूंचे आराध्य दैवत व भगवान विष्णूंचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सर्व हिंदू समाजाला सोबत घेऊन ही शोभायात्रा काढण्यात आली असून यामध्ये सर्व जाती बांधव सहभागी झाले होते.

भगवान परशुराम जन्मोत्सव समिती पुणे च्या वतीने श्री भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त केसरी वाडा ते शनिवारवाडा अशी शोभायात्रा काढण्यात आली. केसरीवाडा येथून शोभायात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे, रोहित टिळक, शैलेश टिळक, संदीप खर्डेकर, समितीचे प्रमुख पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सूर्यकांत पाठक, विश्वजीत देशपांडे, मकरंद माणकीकर यांसह चैतन्य जोशी, मनोज पंचारिया, मयुरेश अरगडे, विश्वनाथ भालेराव, श्रीकांत जोशी, श्यामराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शोभायात्रेत अग्रभागी चौघडा रथ त्यापाठोपाठ जगदंब वाद्य पथक, बाल व युवा वारकऱ्यांचे पथक, पारंपरिक वेशातील महिला आणि मुख्य भगवान श्री परशुराम रथ सहभागी झाला होता. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. संपूर्ण शोभायात्रा मार्गावर रांगोळी व पायघड्या घालण्यात आल्या होत्या.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, हिंदूंनी एक झाले पाहिजे. जातीभेदाच्या भिंती तोडून आपण एकत्र यायला हवे. पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सर्तक राहायला हवे. आपल्यातील जाती विसरून आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. देशासाठी आपण एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या दुर्देवी घटनेमुळे आपण एकत्र राहिलो तर सुरक्षित राहू हा भाव सगळ्यांमध्ये येत आहे. जात माना हे कुठेही म्हटलेलं नाही. आपण सगळे एकत्र आलो, तर आपल्याकडे पाहण्याची कोणाचीही हिमंत होणार नाही, असेही ते म्हणाले.

भगवान परशुराम जन्मोत्सव समिती पुणे च्या अंतर्गत ३० हून अधिक संस्था व संघटना यामध्ये सहभागी झाल्या. त्यामध्ये महाराष्ट्र ब्राह्मण सभा, देवस्था ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र, परशुराम हिंदू सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, ब्राह्मण जागृती सेवा संघ, ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण सेवा संघ वाघोली, याज्ञवल्क्य आश्रम, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघ पुणे, चित्पावन अस्तित्व संस्था, क-हाडे ब्राह्मण महासंघ/ संघ, महाराष्ट्र चित्पावन संघ, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, चित्पावन कट्टा, याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान, अखिल ब्राह्मण संघ, राष्ट्रीय सेवा संघ, पौरोहित्य पुरोहित फाऊंडेशन, विप्र फाऊंडेशन, गौड ब्राह्मण संघ, गौडा सारस्वत ब्राह्मण संघ, चित्पावन मित्र असोसिएशन, श्री राजस्थानी छ:न्याति विप्र मंडल पुणे, विप्र फाऊंडेशन १२ बी झोन पुणे, अखिल भारतीय पेशवा संघटना यांसह अनेक संस्था व संघटनांचा सहभाग होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading