Sunday, May 31, 2026
Latest NewsPUNE

आर्थिकदृष्टया दुर्बल मुलींना मिळणार आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण

पुणे : सध्या सगळीकडे एएआयचे (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे महत्व वाढत आहे. समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल मुलींना देखील याचे शिक्षण घेता यावे, म्हणून रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी – पुणे, एच. जी. फाउंडेशन, सेर्राला इंडिया आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआय सीटी) यांच्या यांच्या वतीने अस्मिता नेक्स्ट उपक्रम सुरु करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी – पुणे या क्लबला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सदर कार्यक्रमात अस्मिता नेक्स्ट उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

यावेळी रोटरी फाउंडेशन, दक्षिण आशियाच्या प्रमुख शकुंतला राहा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर अमेरिकेच्या पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मीना पटेल, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेकनॉलॉजीचे (पीआयसीटी) प्राचार्य डॉ संजय गंधे,  सेर्राला इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक – आलोक अरोरा, एच आर प्रमुख स्वाती मिंच, फॉरेन पार्टनर असलेल्या रोटरी क्लब ल्यूटन नॉर्थ चे बॉब शहा तसेच या अस्मिता नेक्स्ट उपक्रमाचे समन्वयक जिगनेश पंड्या उपस्थित होते.

या विषयी अधिक माहिती देतांना जिगनेश पंड्या म्हणाले की अस्मिता नेक्स्ट उपक्रमात दोन बॅचमध्ये मुलींना आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचे  बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण  मुलींना  देण्याची जबाबदारी  पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेकनॉलॉजी (पीआयसीटी) संस्थेकडे देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शास्त्र शाखेची पदवी आणि कोडिंगचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. या मुलींची निवड रोटरी सदस्यांच्या मदतीने करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या मुलींची फी रोटरी भरणार आहे व त्यांना या प्रशिक्षणासाठी एक आधुनिक लॅपटॉप देखील मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण सहा महिने कालावधीचा हे प्रशिक्षण पूर्ण करताना मुलींना ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येणार असून त्यांना प्लेसमेंटची संधी देखील उपलब्ध करून देण्यावर देखील भर दिला जाणार आहे. या प्रकल्पात निवड झालेल्या प्रत्येक मुलीच्या प्राशिक्षणासाठी सुमारे १ ते सव्वा लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे पंड्या यांनी सांगितले.

सदर उपक्रम सध्याच्या काळात अतिशय महत्वाचा असल्याने तो जागतिक नकाशावर नेण्याची आवश्यकता असल्याचे मत रोटरी फाउंडेशन, दक्षिण आशियाच्या प्रमुख शकुंतला राहा यांनी यावेळी व्यक्त केले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गटातील मुलींना या उपक्रमामुळे एआयचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानात होणारे नवे बदल त्यांना अवगत करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुलींना प्रगती करण्यासाठी त्याची मदत होणार असल्याचे सेर्राला  इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक अरोरा यावेळी म्हणाले.

मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या या विशेष अभ्यासक्रमाचा त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. एआयमुळे सगळ्याच क्षेत्रात प्रगती होत आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गटातील मुलींना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेकनॉलॉजी (पीआयसीटी) मध्ये त्यांना या अभ्यासक्रमासाठी शिकवताना आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे डॉ. गंधे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading