वेगवेगळ्या रुपात आपल्या समोर येणारे संगीत मुळात एकच – श्रीनिवास जोशी
पुणे : ज्याप्रमाणे बर्फ, पाणी, वाफ हे सगळं पाणीच आहे. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या खंडात असणारी माणसे दिसायला वेगवेगळी आहेत पण मानवता एकच आहे. याच प्रमाणे वेगवेगळ्या रुपात आपल्या समोर येणारे संगीत देखील एकच आहे असे मत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व शास्त्रीय गायक पं. श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केले. सुगम संगीतातील प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर व विविध तालवाद्यांचे लोकप्रिय वादक निलेश परब यांना बाबूलाल डाटा कलागौरव पुरस्कार जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आपण जरी शास्त्रीय गायक असलो तरी सुगम संगीत क्षेत्र देखील आपल्या तितकेच आवडीचे असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.
कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने बाबूज लक्ष्मीनारायण चिवडाचे संचालक प्रशांत डाटा यांच्या पुढाकाराने सदर पुरस्कार देण्यात आले. ज्या कलाकारांना पुरस्कार त्यांचाच रसिकांसाठी कार्यक्रम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मेलडीयस मंगेशकर्स हा मंगेशकर कुटुंबीयांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम मयूर कॉलनी कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संपन्न झाला. सदर कार्याक्रमाच्या सुरुवातीला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. रसिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य होता.
पराग माटेगावकर यांनी मंगेश कुटुंबीयांशी संबंधित विविध किस्से सांगत कार्यक्रमात रंगत आणली तर सुवर्णा माटेगावकर व संदीप उबाळे यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दुरचित्रवाणीवर येणाऱ्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे शीर्षकगीत हे संदीप उबाळे यांनीच गायले आहे. सदर गीत तितक्यात ताकदीने सादर करून उबाळे यांनी रसिकांमध्ये एक वेगळीच उर्जा निर्माण केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निलेश परब यांच्या ढोलकी वादनाचा आनंद रसिकांनी घेतला.
