भारताच्या संविधानामुळे देशात लोकशाहीने घट्ट मुळे धरलेली – ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव
पुणे :- जगात स्वातंत्र्यांनंतर जे आशियाई देश स्वतंत्र झाले त्या सर्व देशांनी लोकशाहीचा प्रयोग केला. परंतु कुठेही लोकशाही टिकली नाही आणि भारतामध्ये पंच्याहत्तर वर्षे होऊन सुद्धा देशाचे देशाचे संविधान मजबुतीने पुढे जात आहे, लोकशाहीने घट्ट मुळे धरलेली आहे, त्यामध्ये काही त्रुटी असतीलही परंतु लोकशाहीने चांगली मूळ धरलेली आहे आणि आपण जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. हे शक्य झाले आहे, ते भारताच्या संविधानामुळे याचा आपल्याला कदापिही विसर पडता कामा नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती – २०२५ च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात जागर समतेच्या विचारांचा या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय नेते होते त्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. प्रजासत्ताक भारताला आकार देण्याचं काम त्यांनी संविधानामार्फत केले असल्याचेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात संविधान निर्मितीची ५५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यामधील योगदान या विषयावर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे विशेष व्याख्यान झाले. १४४ कोटी भारतीयांना एकसूत्रात बांधणारी महाशक्ती म्हणजे भारतीय संविधान होय. या संविधानाची निर्मिती संविधान सभेच्या माध्यमातून झाली हे विधान अर्थसत्य आहे. संविधान सभेच्या साडे तीन वर्षाच्या कालावधीत अंतिम संविधान तयार झाले हे खरे असले तरी देशाच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया ५५ वर्षे चालली होती. देशाने केलेल्या एकूण बारा प्रयत्नामधून संविधानाची निर्मिती झाली असे त्यांनी आपल्या व्याख्यानात विवेचन केले.
या कार्यक्रमासाठी प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, डॉ. संजय तांबट, बीओडीचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी केले. तसेच सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यासनप्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे यांनी आभार मानले.
