Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध उपाय योजनांवर विचार – अजित पवार

पुणे :  राज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनाकडून वारंवार मदत केली जात असून एसटीचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध उपाय योजनांवर विचार केला जात आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनाची पूर्ण रक्कम मिळाली नाही. वेतनापैकी केवळ 56 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली असून 44 टक्के रक्कम मिळालेली नाही. या संदर्भात अजित पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करू, असे आश्वासनही पवार यांनी दिले. 

देशातील कोणतीही सार्वजनिक प्रवासी वाहतूक संस्था फायद्यात नसते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता यावा त्यासाठी अशा संस्था महत्त्वाच्या असतात. त्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला वारंवार मदत केली जाते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

करोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प असताना देखील राज्य शासनाने एसटी महामंडळाला अडीचशे ते तीनशे कोटी रुपये दिले आहेत. मोफत प्रवासाच्या विविध सवलतींच्या पोटी राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला निधी दिला जातो. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते, असेही पवार यांनी सांगितले. 

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाय योजनांवर विचार सुरू आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई बसेस खरेदीचा प्रस्ताव दिला आहे या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाच्या मोठ्या जागा विविध शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहेत. या जागा व्यावसायिक बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी साठ वर्षाचा दीर्घकालीन करार केला जाईल. त्यानंतर हा करार आणखी 30 वर्ष वाढवला जाईल. त्यातून एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळू शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

महात्मा फुले स्मारकाचे राजकारण नको 

Aराज्य शासनाच्या वतीने महात्मा फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या स्मारकावरून राजकारण केले जाऊ नये, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. या संदर्भात छगन भुजबळ यांची भेट घेणार असून त्यांना उपोषण करावे लागणार नाही, याची ग्वाही देणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading