भिमतर्फे ‘पैसों की कदर’ या नव्या कॅम्पेनसह ‘भारत का अपना पेमेंट्स अॅप’ अशी ओळख तयार करण्यावर भर
मुंबई – भिम हे भारतातील स्वदेशी पेमेंट अॅप विकसित करणाऱ्या एनपीसीआय भिम सर्व्हिसेस लिमिटेड (एनबीएसएल) या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) पूर्ण मालकीच्या उपकंपनीने नवीन ब्रँड कॅम्पेन लाँच केले आहे. ‘भारत का अपना पेमेंट्स अॅप’ अशी या ब्रँडची ओळख तयार केली जाणार आहे. ‘पैसों की कदर’ या कॅम्पेनमध्ये भारतातील पेमेंट्सच्या पद्धती विकसित झाल्या असल्या, तरी पैशांचा व्यवहार कशा प्रकारे विश्वास आणि ओळखीवर चालतो, हे दाखविण्यात आलं आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून भिमची आधुनिक व सर्वसमावेशक पेमेंट्स अॅप अशी ओळख तयार केली जाणार आहे. त्याद्वारे देशभरातील लोकांच्या दैनंदिन पेमेंट्सच्या गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत.
टिल्ट ब्रँड सोल्युशन्सची संकल्पना असलेल्या या कॅम्पेनमध्ये पाच ब्रँड फिल्म्सचा समावेश करण्यात आला आहे. या फिल्ममध्ये भिम ब्रँडची प्रमुख तत्त्वे – विश्वास, सुरक्षा, ग्राहकास प्राधान्य आणि सर्वसमावेशकता अधोरेखित करत, या अॅपची उपयुक्तता दाखविण्यात आली आहे. ही फिल्म जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ९ भारतीय भाषांत प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हे कॅम्पेन भिम ३.० लाँचच्या निमित्ताने बनविण्यात आले असून, ते जास्त इंट्युटिव्ह आणि ग्राहकस्नेही अनुभव देणारे आहे. त्यामध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आली असून, त्यात १५ पेक्षा जास्त भाषा, कमी इंटरनेट असलेल्या ठिकाणीही वापर शक्य करणारे, पैशांच्या व्यवस्थापनासाठी सुधारित साधने उदा – स्पिल्ट एक्सपेन्सेस, फॅमिली मोड, स्पेंड अनालिटिक्स आणि अॅक्शन नीडेड रिमाइंडर्स यांचा समावेश आहे.
एनबीएसएलचे प्रमुख व्यवसाय अधिकारी राहुल हांडा म्हणाले, ‘भारतात नवं तंत्रज्ञान आपलंसं करताना विश्वासाची भूमिका मोठी असते, विशेषतः पैशांच्या बाबतीत. भारताच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की, डिजिटल पेमेंट्स फक्त सोयीसाठी नाहीत, तर त्यात आत्मविश्वासही येतो. भिम ३.० सह आम्ही सोपा, सुरक्षित आणि परिचित अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ‘पैसों की कदर’ कॅम्पेनमध्ये हीच गोष्ट मांडताना आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, पैशांच्या व्यवहाराची पद्धत बदलली आहे, पण मूल्यं तीच आहेत. म्हणूनच भिम हे खऱ्या अर्थानं आपलं पेमेंट अॅप आहे.’
टिल्ट ब्रँड सोल्युशन्सचे समूह प्रमुख क्रिएटिव्ह अधिकारी आदर्श अटल म्हणाले, ‘भारतात पैसे हे फक्त विनिमयाचं साधन नाही. लोक ज्याप्रकारे पैशांचा व्यवहार हाताळतात, त्यातून त्यांची मतं, त्यांची मूल्य, प्राधान्यक्रम, व्यक्तिमत्त्व आणि अशा बऱ्याच गोष्टी दिसून येतात. आपण पैसे कशा प्रकारे हाताळतो, हे आपण कशा प्रकारे जगतो, त्याचं प्रतिबिंब आहे. ‘पैसों की कदर’ कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही पैशांची संकल्पना व्यवहारांच्या पलीकडे जात, त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी आणि गुणांसह उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’
हे ३६० डिग्री कॅम्पेन टीव्ही, प्रिंट, आउट ऑफ होम, सिनेमा, रेडिओ, डिजिटल आणि सोशल मीडियातून प्रसारित केले जाणार आहे. हे कॅम्पेन आघाडीच्या टीव्ही चॅनेल्सवर, वेगवेगळ्या भागांत दाखविले जाणार असून, ब्रँड फिल्म्स भिमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केल्या जातील.
