न्यू वेव्ह आर्ट इनिशिएटिव्ह या चित्र प्रदर्शनाचे ११ ते १३ एप्रिल दरम्यान आयोजन
पुणे : मालविका गौर आणि जेहन कोठारी यांच्या संकल्पनेमधून विवा आर्टच्या वतीने येत्या शुक्रवार दि. ११ एप्रिल ते रविवार दि. १३ एप्रिल दरम्यान एरंडवणे भागातील द बॉक्स या ठिकाणी न्यू वेव्ह आर्ट इनिशिएटिव्ह (एनडब्लूएआय) या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत केवळ निमंत्रितांसाठी प्रदर्शन खुले असून १२ व १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायं ६ दरम्यान प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल याची कृपया नोंद घ्यावी.

वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या कलाकारांना एकत्र आणत त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील विवा आर्टच्या वतीने ‘न्यू वेव्ह आर्ट इनिशिएटिव्ह’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी चितारलेली चित्रे हे या प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य असून या सर्व कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या यामागील उद्देश आहे.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रदर्शनाच्या आयोजक असलेले जेहन कोठारी म्हणाले, “न्यू वेव्ह आर्ट इनिशिएटिव्ह (एनडब्लूएआय) हे वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या आश्वासक कलाकारांना एकत्र आणत त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. यामध्ये आर्मी, हवाई आणि नौदलातील अधिकारी, कर्मचारी या संरक्षण दलातील कलाकारांसोबतच नागरी सेवा, कॉर्पोरेट्स, कला संस्था आणि व्यावसायिक कलाकार अशा सर्वांचा समावेश आहे. उदयोन्मुख आणि प्रतिथयश कलाकार यांना एकत्र आणणे हा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश आहे.”

मागील वर्षी दिल्लीत झालेल्या प्रदर्शनाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर यावर्षी पुण्याच्या प्रदर्शनासाठी आम्ही उत्साही असून सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या शहरात अशा प्रकारचे व्यासपीठ रसिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास यावेळी आयोजक मालविका गौर यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने तब्बल १२०० हून अधिक कलाकारांशी आम्ही जोडले गेले असेही त्यांनी नमूद केले.
सदर प्रदर्शनाचे क्युरेटर म्हणून प्रसिद्ध चित्रकार राजू सुतार यांनी काम पाहिले आहे अशी माहितीही यावेळी गौर यांनी दिली. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कलाकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळेल असे राजू सुतार यांनी नमूद केले.
वर नमूद केल्याप्रमाणे प्रदर्शनामध्ये संरक्षण दलातील अधिकारी, कर्मचारी यांसोबतच इतर क्षेत्रातील ४० हून अधिक कलाकारांची कला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जलतरंग, अॅक्रॅलिक अशा विविध चित्रांचा समावेश आहे. सैन्य दलातील कलाकारांचे अनुभव, त्यांच्या कथा कलाकृतींच्या निमित्ताने प्रदर्शनादरम्यान पाहता येतील.
