‘चाहे कृष्ण कहो या राम’ या सांगीतिक कार्यक्रमातून मराठी नववर्षाचे स्वागत
पुणे : प्रतिथयश तबलावादक प्रशांत पांडव आणि त्यांचे शिष्य गीत इनामदार व किशोर पांडव यांच्या स्वर- नाद म्युझिक फाऊंडेशनच्या वतीने मराठी नवीन वर्षाचे औचित्य साधत गुढी पाडव्याच्या दिवशी ‘चाहे कृष्ण कहो या राम’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मयूर कॉलनी मधील एम.ई.एस. बालशिक्षण मंदिराच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते व आपला परिसरचे उज्ज्वल केसकर, प्रसिद्ध गायक व संवादिनीवादक प्रभाकर पांडव, प्रशांत इनामदार, मारुतीराव शिंदे यांचे हस्ते झाले. यावेळी भूषण सहस्त्रबुद्धे, निरंजन आगाशे, साकेतचंद्र नातू आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वर-नाद संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम असून यावेळी स्वर-नाद च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये पं विजय कोपरकर व विदुषी प्रतिमा टिळक यांच्या शिष्या गायिका श्रुती बुजारबरुआ- गोडबोले आणि पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांचे गायन झाले. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही गायकांनी श्लोकाने केली. त्यानंतर ललत रागामधील जाने ना दुंगी कान्हा…ही बंदिश अमोल यांनी गायली. या पाठोपाठ श्रुती यांनी राम पंचायतानाचे वर्णन करणाऱ्या दोन बंदिशी सादर केल्या ज्यामध्ये चलो री माई राम सिया दरसोन को..आणि करत बरं जोगी न मानी शाम रे..यांचा समावेश होता. यानंतर श्रुती यांनी श्रीराम रामचंद्र कृपाळू भजमन…ही रचना गायली आणि सगळे वातावरण राममय झाले.
रामाच्या शक्तींनी भरलेल्या अनेक रचना आहेत. त्यामध्ये आरंभी वंदीन अयोध्येचा राजा…हा समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग अमोल यांनी आपल्या शैलीमध्ये गायला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यापाठोपाठ श्रुती यांनी ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां ही रचना सुंदररित्या सादर केली. कृष्णाच्या बालपणाच्या लीलांचे वर्णन असणारे अनुप जलोटा यांनी गायलेले भजन.. मैया मोरी मैने ही माखन खायो याचे ब्रज भाषेतून गद्य वर्णन करत अमोल यांनी हे भजन समरस होऊन गायले आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. स्वयंवर नाटकातील श्रुती यांनी नरवर कृष्ण समान.. हे नाट्यसंगीत सादर केले..नंतर सांगा मुकुंद कुणी हा पहिला… दे रे कान्हा चोळी अन् लुगडी..ही पिंजरा चित्रपटातील भेदिक लावणी, जग में सुंदर है दो नाम, चाहें कृष्ण कहो या राम अशी अनेक सुंदर गीते सादर झाली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतरामायणातील दशरथा घे हे पायस दान..आणि राम जन्मला गं सखी ह्या रचना अमोल आणि श्रुती यांनी सादर केल्या. बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया.. मोहे पनघट नंदलाल छेड गयो रे.. अशी अनेक गीते सादर झाली. ‘चाहे कृष्ण कहो या राम’ या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आधारित संगीताच्या विविध रंगांनी नटलेली एक भक्तिरसपूर्ण सांगीतिक पहाट या कार्यक्रमाद्वारे रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आणि नवीन वर्षाची सुरेल सुरुवात झाली.
यावेळी प्रशांत पांडव (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), धवल जोशी (बासरी), विनीत तिकोणकर (पखवाज), क्षितिज भट (कीबोर्ड), उद्धव कुंभार (साईड रिदम) या कलाकारांनी समर्पक साथसंगत केली. या कार्यक्रमाचे विस्तृत आणि अभ्यासपूर्ण निवेदन रवींद्र खरे यांनी केले.
