पं. उल्हास कशाळकरांच्या स्वरसिद्ध गायनाची पर्वणी
पुणे : ‘कलाकाराने कलाकारांसाठी तयार केलेले एक हक्काचे व्यासपीठ म्हणजे गंधार क्रिएटिव्हज्’, अशा शब्दांत आपल्या नव्या सर्जनशील उपक्रमाचा परिचय करून देत, स्वर गंधार ही शुभारंभाची मैफल शनिवारी सकाळी रंगली. पद्मश्री पं. उल्हास कशाळकर आणि युवा संतूरवादक डॉ. शंतनु गोखले यांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
पुण्यातील प्रसिद्ध संवादिनीवादक अमेय बिच्चु यांच्या ‘गंधार क्रिएटिव्हज्’ या संस्थेच्या वतीने स्वर गंधार या शुभारंभाच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात ही मैफल संपन्न झाली. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला होता.
यावेळी बोलताना अमेय बिच्चु म्हणाले, “या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रम, कार्यशाळा यांचे आयोजन करणे, याबरोबरच भारतीय शास्त्रीय संगीतात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या नव्या पिढीतील अनेकांना प्रसिद्ध कलाकारांसोबत संवाद साधता यावा, त्यांची कला अनुभविता यावी हा गंधार क्रिएटिव्हजचा उद्देश आहे. त्यामुळेच ‘कलाकाराने कलाकारांसाठी ‘ (बाय द आर्टिस्ट फॉर द आर्टिस्ट) अशी टॅगलाईन घेऊन आम्ही सुरवात करत आहोत.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, तालयोगी पं सुरेश तळवलकर आणि ज्येष्ठ संवादिनीवादक पं. प्रमोद मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘गंधार क्रिएटिव्हज्’ चे दीपप्रज्ज्वलनाने औपचारिक उद्घाटन झाले. यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन रंगले. त्यांनी राग अहिरभैरवमध्ये आलाप, जोड, झाला या क्रमाने वादन सादर केले. झपताल आणि त्रितालातील रचनांना तसेच उत्तरार्धातील द्रुत वादनाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली. त्यांना आशय कुलकर्णी यांनी पूरक तबलासाथ केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पं. उल्हास कशाळकर यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘ललत’ मध्ये दोन रचना सादर केल्या. ‘भोरही आये’ (तिलवाडा ताल) आणि ‘तडपत हूं जैसे’ (त्रिताल) या रचनांपाठोपाठ त्यांनी त्रितालातील तराणाही सादर केला. त्यानंतर पं. कशाळकर यांनी राग ‘गौडसारंग’ मध्ये तीन बंदिशी प्रस्तुत केल्या. ‘पाती झर गैया’ (ताल झुमरा), ‘सैया परो’ (त्रिताल) आणि ‘मांडे खबर’ (एकताल) ही पंजाबी बोल असलेली बंदिश होती. पं. कशाळकर यांच्या स्वरसिद्ध गायनाने गंधार क्रिएटिव्ह्ज या नव्या उपक्रमाचा सुरेल शुभारंभ झाला, अशी रसिकांची भावना होती. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबला) तर अमेय बिच्चु (संवादिनी) यांनी अनुरूप साथसंगत केली. अद्वैत केसकर, साईऐश्वर्य महाशब्दे आणि निर्भय सक्सेना यांनी स्वर आणि तानपुरा साथ केली. आशिष केसकर, मकरंद केळकर आणि नितीन बिच्चु यांनी सर्वांचे स्वागत केले. स्वानंद पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
