Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर आज बुलडोझर चालवला जाणार

नागपूर: प्रतिनिधी 

औरंगजेबाच्या कबरीचे प्रतिकात्मक दहन करून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या आंदोलनानंतर येथे झालेल्या दंगलीचा सूत्रधार फहीम खान याच्या दुमजली घरावर आज बुलडोझर चालवला जाणार आहे. फहीम खान याचे बेकायदेशीर दुमजली घर जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने बजावलेल्या नोटीशीची मुदत आज संपुष्टात आली आहे. फहीम खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याचे घर रिकामेच आहे. 

औरंगाबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने महाल परिसरात आंदोलन करण्यात आले. आदेशळी आंदोलकांकडून औरंगजेबाच्या कबरीचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. या वेळी धर्मग्रंथातील मजकूर जाळला गेल्याची अफवा समाज माध्यमातून पसरवण्यात आली. 

ही अफवा पसरवण्यात आल्यानंतर महाल आणि आजूबाजूच्या परिसरात जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. अनेक वाहनांची आणि घरांची तोडफोड करण्यात आली. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. एका पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले तर एका महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दंगलीची गंभीर दखल घेतली असून दंगेखोरांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दंगेखोरांची ओळख पटवून शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून या दंगलीचा सूत्रधार समजल्या जाणाऱ्या फहीम खान याचे संजय बाग कॉलनी येथील दुमजली घर बुलडोझर चालून जमीनदोस्त करण्यात येणार आहे. 

फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. त्याचे घर जमीनदोस्त करण्याबरोबरच त्याच्याशी संबंधित दोन दुकानांवरही टाच आणण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या दोन दुकानांचा वापर दंगेखोरांनी दंगलीच्या दरम्यान हिंसक कारवाया करण्यासाठी केला आहे. फहीम खान याच्या पक्षाचा आणखी एक पदाधिकारी सईद असीम अली याची देखील पोलीस चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading