कलाकाराची जबाबदारी मोठी; पद्मश्री शेखर सेन
पुणे : बाराखडीमध्ये वर्ण आणि अक्षरे असतात. जे क्षर होत नाहीत, नष्ट होत नाहीत ते म्हणजे अक्षर आहे. जेव्हा तुम्ही काही गाता तेव्हा रसिक प्रेक्षक ते कधीच विसरत नाही. इथेच कलाकाराची जबाबदारी वाढते. त्यामुळे आम्हाला बोलण्याआधी दहा वेळा तर गाण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेते आणि आपल्या एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेले पद्मश्री शेखर सेन यांनी केले. तुम्ही काय आणि कसे गाता हे रसिक प्रेक्षक लक्षात ठेवतो आणि २५ वर्षांनंतरदेखील तो तुम्हाला सांगू शकतो की त्या दिवशी तुमचा आवाज ठीक नव्हता ही गाण्याची ताकद असल्याचेही सेन यांनी नमूद केले.
आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित १९ व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवामध्ये यावर्षी शेखर सेन यांचा माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रदीर्घ कलासेवेकरीता पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याबरोबरच आज महोत्सवामध्ये अमेरिकेत शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आयोजक राजेश गोडबोले यांचा यशस्वी संयोजक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गोडबोले यांच्या वतीने त्यांच्या भगिनी सुमेधा वझे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांसोबतच पं जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आणि शिष्य पं शौनक अभिषेकी, आपला परिसरचे उज्ज्वल केसकर, प्रवीण बढेकर, पं. हेमंत पेंडसे, सुमेधा वझे, डॉ. संदीप पुटाला, विद्येश रामदासी, अंकुश भगत आणि महेश पानसे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उद्या शनिवार दि. २२ आणि रविवार दि. २३ मार्च रोजी सकाळी ९ ते १२ आणि सायं ५ ते १० अशा चार सत्रांमध्ये महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.
यावेळी पुढे बोलताना सेन म्हणाले, “आम्ही कलाकार भाग्यवान आहोत कारण संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रात काम करत असताना कलाकार आणि समोरचा प्रेक्षक असे आम्ही दोघेही सुखी असतो, आनंदी असतो. यापेक्षा मोठा आनंद नाही असे मला वाटते.” त्यातही मी जेव्हा संत, महात्मांचा अभिनय करतो तेव्हा त्यांचे व्यक्तीमत्त्व मला २ एक तास परकाया प्रवेश करून जगता येते ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असल्याचेही सेन यांनी नमूद केले.
पं जितेंद्र अभिषेकी यांचे गाणे आजही आवडीने ऐकले जाते असे सांगत प्रकाश जावडेकर म्हणाले, “संगीतात जबरदस्त ताकद आहे असे मला वाटते. संगीत माणसाला दु:खाच्या प्रसंगी सकारात्मक उर्जा देते. काम करिता असताना मागे जर गाणे अथवा वादयाच्या सुरावटी सुरु असतील तर ‘वर्क इफिशियन्सी’ १५ ते २० टक्के वाढते असे संशोधन सांगते. भारतीय संगीत ही आपल्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे.” जर आपण किमान कानसेन असू तर आपले आयुष्य सार्थक झाले असे म्हणता येईल असेही जावडेकर यांनी नमूद केले. संगीत नाटक अकादमीचे संचालक म्हणून शेखर सेन यांनी केलेल्या कामाचे कौतुक यावेळी जावडेकर यांनी केले.
या नंतर पं. शौनक अभिषेकी, डॉ.सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘हे बंध रेशमाचे’ हा सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला. ‘ओंकार अनादी अनंत…’ या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वैभव जोशी यांनी वसंतराव देशपांडे यांच्यावर केलेली कविता ‘कंठात आर्त ओळी…’ ही कविता सादर केली तर संदीप खरे यांनी ‘बाथरूम सिंगर’ ही कविता गायली.
पं. शौनक अभिषेकी यांनी ‘काटा रुते कुणाला…’चे सादरीकरण केले. याबरोबरच कवयित्री शांता शेळके यांच्या कविता देखील सादर झाल्या. यावेळी आदित्य ओक (तबला), राजेंद्र नूरकर (ढोलकी) आणि रितेश ओहोळ (गिटार) या कलाकारांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रुती निगुडकर, रवींद्र खरे यांनी केले. पं. हेमंत पेंडसे यांनी तरंगिणी प्रतिष्ठानबद्दल तर विद्येश रामदासी यांनी आपला परिसर बद्दल उपस्थितांना माहिती दिली.
