राष्ट्रीय स्तरावरील पखवाजवादन स्पर्धेतपुणेकर पार्थ भूमकर यांना द्वितीय पारितोषिक
पुणे : महाराष्ट्राचे प्रसिद्ध पखवाजवादक ह.भ.प. तुकारामबुवा भूमकर यांचे नातू आणि युवा पखवाज वादक पार्थ भूमकर यांनी गुजरात राज्य संगीत अकादमी यांच्यातर्फे आयोजित “पं. नंदन मेहता शास्त्रीय तालवाद्य” (सप्तक) स्पर्धेत पखवाज वादनात राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला. १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
पार्थ यांनी वयाच्या चौथ्या वर्षांपासून आपल्या आजोबांकडून आणि वडील अमित भूमकर यांच्याकडून पखवाज वादनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. सर्वात लहान पखवाजवादक म्हणून वयाच्या आठव्या वर्षीच त्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पं. रविशंकर यांच्या उपस्थितीत नाव नोंदले गेले.
2021 मध्ये ‘मृदंग विशारद’ ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यांनी अनेक स्पर्धामधून एकल वादन केले आहे तसेच पं. सुरेश तळवलकर यांच्या “तालयात्रा” कार्यक्रमात अनेकदा पेशकश केली आहे.
पार्थने पद्मभूषण पं. विश्वमोहन भट, पदमश्री पं. विजय घाटे, विदुशी मंजुषा पाटील अशा अनेक कलाकारांना पखवाज वादनाची साथ केली आहे. सध्या पार्थ पुणे विद्यापीठातील ललित केंद्रात पखवाजवादनात एम.ए.(संगीत) करत आहेत.
