‘व्हिज्युअल नोटिंग्ज्’ या प्रो अनंत कुलकर्णी यांच्या स्केचबुक्स व ग्राफिक डिझाईनमधील कामाच्या प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया अर्थात एडीआयच्या पुणे विभागाच्या वतीने आपल्या खास शैलीसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध डिझायनर आणि इलस्ट्रेटर दिवंगत प्रो. अनंत कुलकर्णी यांनी चितारलेली चित्रे आणि स्केचबुक्स यांचे प्रदर्शन पाहण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे.
येत्या गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ते रविवार दि. २ मार्च दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्तावरील कृषी विद्यापीठ चौकातील पुणे हातकागद संस्थेच्या (पुणे हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटच्या) आवारात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी सायं ४ ते ७ तर उर्वरित तीनही दिवशी (२८ फेब्रुवारी व १, २ मार्च) सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे याची कृपया नोंद घ्यावी.
या प्रदर्शनाद्वारे डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांचे कार्य या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीतील डिझायनर्स पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न एडीआयच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती एडीआयच्या पुणे विभागाचे अध्यक्ष योगेश दांडेकर यांनी दिली.
आयआयटी इंदौर येथील प्रमुख प्रोफेसर, इंदौर येथील श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सेंटर फॉर डिझाईन स्टडीजचे मेंटॉर म्हणून कार्यरत असलेले आणि आयआयटी बॉम्बेच्या इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर (आयडीसी) येथील माजी प्राध्यापक असलेले डिझाईन सल्लागार कीर्ती त्रिवेदी यांनी हे प्रदर्शन क्युरेट केले असून हे या महोत्सवाचे आणखी एक खास वैशिष्ट्य असणार आहे. त्रिवेदी यांचा डिझाईन उद्योग क्षेत्राचा अनुभव आणि दृष्टीकोन या प्रदर्शनाच्या माध्यमातून येथे भेट देणाऱ्यांना पाहता येईल.
प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना कीर्ती त्रिवेदी पुढे म्हणाले की, “भारतीय म्हणून आपण स्वतःच्या सर्जनशील कार्याचे दस्तऐवजीकरण व सादरीकरण करण्यात कमी पडत आलो आहोत हे आम्हाला जाणवले त्यामुळे या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. या द्वारे आपले दिग्गज गुरु, त्यांचे कार्य, डिझाईनमागील त्यांचा दृष्टीकोन मांडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.”
या प्रदर्शनामध्ये प्रा. कुलकर्णी यांच्या मूळ स्केचबुक्स, पेंटिंग्ज, यांसोबतच कॅलेंडर, डायरी, फ्लिपबुक, कप, प्लेट्स आणि अगदी ॲनिमेशन क्लिपवर त्यांनी चितारलेल्या डिझाइन्स मोठ्या पोस्टरवर उपस्थितांना पाहता येतील. याबरोबरच प्रो कुलकर्णी यांची अक्षरांची स्वाक्षरी व नाविन्यपूर्ण टायपोग्राफी हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरेल हे विशेष. या प्रदर्शनामध्ये जणू प्रत्येक गोष्टीत एक डिझाईन पाहणाऱ्या एका डिझाईनरची कथाच सांगण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही त्रिवेदी यांनी नमूद केले. प्रो. कुलकर्णी यांचे पुत्र समीर कुलकर्णी यांची या प्रदर्शनासाठी खूप मदत झाली असल्याचे कीर्ती त्रिवेदी आवर्जून म्हणाले.
