Wednesday, September 23, 2026
Latest NewsPUNE

पराक्रम व युद्धाव्यतिरिक्त शिवरायांची इतर कारकिर्द देखील समजून घ्यायला हवी – व्याख्याते केतन पुरी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजविलेला पराक्रम, अफजलखान वध, शाहिस्तेखान बोटे छाटली, सुरतेवर स्वारी, आग्राहून सुटका याव्यतिरिक्त देखील त्यांचे कार्य मोठे आहे. त्याचा आपण अभ्यास करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध करीत नव्हते. तर अनेक गोष्टी त्यांनी केल्या आहेत. शिवरायांच्या वयाच्या ५० वर्षांत लहानपणाची १६ वर्षे सोडली, तर त्यांची मुख्य कारकिर्द ३४ वर्षांची आहे. त्यात ६ ते ७ वर्षे वरील मोठे पराक्रम झाले. तरी देखील याव्यतिरिक्त २६ वर्षे शिवरायांनी काय केले? हे आपण समजून घेतले पाहिजे, असे व्याख्याते केतन पुरी यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२५ चे आयोजन दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, विशाल केदारी, अमोल चव्हाण, अंकुश रासने, तुषार रायकर, अमोघ बिरमल यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाचे राजाभाऊ पायमोडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेले परकीय व्यक्ती याविषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

केतन पुरी म्हणाले, शिवरायांच्या काळात इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे भारतात आले. त्यावेळी परदेशातून आलेल्या व्यक्ती शिवरायांना भेटल्या. त्यांनी याविषयी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. शिवराय जीवंत असताना एका पोर्तुगीज व्यक्तीने त्यांच्यावर पुस्तक लिहिले होते.

ते पुढे म्हणाले, मुंबई आणि सुरत ही शिवरायांच्या काळातील महत्वाची बंदरे. सुरतेमध्ये २ लाखापेक्षा जास्त लोक रहात होते. सन १६६४ मध्ये सुरतेवर पहिली स्वारी केली. त्यावेळी सुरत आणि मुंबईचे नाव पुढे आले. इतिहासातील उल्लेखांमध्ये राज्याभिषेकाच्यावेळी इंग्रज व्यक्ती दिसतात. त्यांनी या राज्याभिषेकाचे संपूर्ण वर्णन करुन ठेवले आहे. त्यामुळे या परदेशी व्यक्तींकडून देखील आपल्याला शिवरायांचा इतिहास अभ्यासायला मिळतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे पैलू सर्वांसमोर यावे आणि त्यातून मार्गदर्शक दिशा मिळावी. तसेच समाजप्रबोधन व्हावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ट्रस्टतर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. शिवजयंतीच्या निमित्ताने देखील असे उपक्रम ट्रस्टतर्फे घेण्यात येत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading