Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर तर्फे बीएनसीएला सर्वोत्कृष्ठ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

प्राध्यापक व 40 विद्यार्थिनींनी साकारला रास्ता पेठ समूह पुनर्विकास अभ्यास प्रकल्प
 

पुणे,4 फेब्रुवारी 2025    : वास्तूरचनाशास्त्रात देशातील शिखर संस्था असणाऱ्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा अर्बन स्टूडिओ रिसर्च प्रोजेक्ट (यूएसआरपी) आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मानाचा सर्वोत्कृष्ट तीन पुरस्कारात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनचा  (बीएनसीए) समावेश झाला आहे. पुण्यातील ऐतिहासिक रास्ता पेठ भागात बीएनसीएतील प्राध्यापक आणि 40 विद्यार्थिनींनी मिळून रास्ता पेठ समूह पुनर्विकास (क्लस्टर रिडेव्हलपमेंट) अभ्यास प्रकल्प तयार केला होता. त्याचे पारितोषिक वितरण बंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय परीक्षण सोहळ्यात करण्यात आले. एक लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  

बीएनसीएतील या अभ्यास प्रकल्प प्रमुख डॉ. वैशाली अनगळ असून त्यामध्ये डॉ. शार्वेय धोंगडे, डॉ. सुजाता कर्वे, प्रा. चैतन्य पेशवे, प्रा. सोनाली मालवणकर, प्रा. देवा प्रसाद आणि प्रा. सिद्धी जोशी यांचा समावेश आहे. डॉ. अनगळ आणि डॉ. धोंगडे यांनी हा पुरस्कार कौन्सिलचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते स्वीकारला. हा पुरस्कार सोहळा दयानंद कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये झाला असून त्यावेळी ज्येष्ठ आर्किटेक्ट राज रेवाल उपस्थित होते. 

या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप म्हणाले की, सामाजिक बांधिलकीतून    उपयोगी ठरणाऱ्या प्रकल्पांच्या पुरस्काराची परंपरा या पुरस्काराने कायम ठेवली आहे. रास्ता पेठ पुरर्विकास अभ्यासप्रकल्पातून आमच्या विद्यार्थिनींना त्या भागातील तळागाळातल्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. कौन्सिलच्या पुढाकारातूनच या शहर विकासाशी संबंधित या अभ्यासप्रकल्पाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.  

डॉ. अनगळ म्हणाल्या की, ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या पुण्यातील रास्ता पेठेतील शहरी पोत हा त्यातील वास्तूरचनेच्या दृष्टिने असणारे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्त्व व संस्कृतीतून जोपासला गेला आहे. त्यातूनच या व आसपासच्या परिसराशी तेथील रहिवाशांचे भावनिक बंध निर्माण झाले आहेत. या साऱ्या गोष्टींचा विचार लक्षात घेऊनच त्याचा समूह पुनर्विकासाच्या परिणामकारकतेचा  अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार तेथील लोकसंख्या घनतेचा विचार करून संयुक्त विकास नियंत्रण आणि वृद्धी अधिनियम उर्फ यूडीसीपीआरच्या (युनिफाईड डेव्हलपमेंट  कंट्रोल ॲण्ड प्रमोशन रेग्यूलेशन) मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बीएनसीएतील चौथ्या वर्षातील विद्यर्थिनींनी एक संभाव्य सामुहिक पुनर्विकासाचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. त्यामध्ये या परिसरात निवासायोग्य मापंदडांचाही विचार करण्यात आला असून कार्यशाळेच्या माध्यमातून   एप्रिल 2023 मध्ये हे प्रारूप रास्ता पेठेतील रहिवाशांसमोर सादर करण्यात आले. त्यामध्ये रास्ता पेठेच्या पुनर्विकासावर फलक, त्रिमीती प्रतिकृती आणि आभासी तंत्रज्ञानाच्या (व्हर्चुअल रिॲलिटी) वापर करण्यात आला.

या प्रकल्पात स्थानिक रहिवाशांना सहभागी करून घेतलेल्या कार्यशाळेतून निघालेले  निष्कर्ष, मार्गदर्शक तत्त्वे आणि यूडीसीपीआरमध्ये बदल करण्याविषयी सूचना राज्य सरकारला सादर करण्यात येतील. त्यातील पथदर्शी मार्गदर्शक तत्त्वांचा वापर देशभरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जुन्या रहिवासी वस्त्यांमधील समूह पुनर्विकासासाठी प्रभावीपणे करता येईल. असेही डॉ. अनगळ यांनी स्पष्ट केले.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading