Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न – जितेंद्र आव्हाड

ठाणे:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात असून त्यासाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून खासदारांशी संपर्क साधला जात असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

अजित पवार गटाला राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान अधिक बळकट करायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी तटकरे खासदारांना संपर्क करीत आहेत. ‘बाप- लेकीला राहू दे बाजूला, तुम्ही इकडे या,’ असे आपल्या खासदारांना सांगितले जात आहे, असे आव्हाड म्हणाले. 

एकीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, तसे काही असते तर तटकरे यांनी आमच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न केला नसता. प्रत्यक्षात तटकरे यांना काका पुतण्या एकत्र आलेले नको आहेत. आम्हालाही त्यांच्याबरोबर जाण्याची इच्छा नाही. त्यांनी आमचा पक्ष नेला. चिन्ह नेले. आता खासदार नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आपल्या पक्षाच्या खासदारांनी तटकरे यांचे म्हणणे धुडकावून लावले आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले. 

केंद्रातील राजकारणात नितीश कुमार यांना धाकात ठेवण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार आमच्याकडे येणार, उद्धव ठाकरे आमच्याकडे येणार असे सांगून नितीश कुमार यांच्यावरचा दबाव वाढवला जात आहे, असेही आव्हाड यांनी नमूद केले. 

‘केंद्रातील मंत्री पदासाठी फोडाफोडी’

अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद हवे आहे. प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांना मंत्री करायचे आहे. मंत्रीपद हवे असेल तर त्यासाठी आवश्यक असलेला खासदार संख्येचा कोटा पूर्ण करण्यासाठी शरद पवार गटाचे खासदार फोडून आणा असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. दिल्लीत राक्षस बसलेले आहेत. त्यांच्याकडे सत्ता आहे. ईडी सारख्या यंत्रणा आहेत. त्याच्याच जीवावर हे सगळे सुरू आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि अजित पवार गटावर केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading