जैव इंधनाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमध्ये डॉ. प्रमोद चौधरी यांचे योगदान मोठे – नितीन गडकरी
पुणे : देशातच नव्हे तर जगभरात जैव इंधन क्षेत्रात झालेल्या क्रांतीमध्ये डॉ. प्रमोद चौधरी यांचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. भारताचे ‘इथेनॉल मॅन’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ उद्योजक व प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृतयोग’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मॅरिएट येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गडकरी हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शां. ब. मुजुमदार, फोर्स मोटरचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, पर्सिस्टंटचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा, प्राजच्या बायोएनर्जी बिझनेसचे अध्यक्ष अतुल मुळे उपस्थित होते. डॉ. प्रमोद चौधरी यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पाटेठाण यांच्या वतीने डॉ. चौधरी यांना मानपत्र देत त्यांना सन्मान देखील करण्यात आला.

जैव इंधनाच्या क्षेत्रात डॉ. प्रमोद चौधरी यांनी केलेले काम अभूतपूर्व असून गेल्या ५० वर्षांमध्ये त्यांनी खूपच संघर्ष करून या क्षेत्रात यश मिळवले असे सांगत नितीन गडकरी म्हणाले, “देशातील लोकांना जैव इंधनाचे महत्व पटवून देण्याचे काम त्यांनी केले. ऊसापासून इथेनॉल तयार करण्याच्या बरोबरच अन्य अनेक गोष्टींपासून ते तयार करण्याचा प्रयोग राबवण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे गतिमान झाली. या सगळ्या कामात चौधरी यांनी केलेलं काम खूपच मोठे आहे. गेल्या वर्षी मक्याला १२०० रुपये क्विंटलचा भाव होता, पण त्याच्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरवात झाली त्यामुळे त्याच्या भावात आता थेट दुपटीने वाढ झाली आहे.”
वेगवेगळ्या धान्यापासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया गतिमान होऊ लागल्यामुळे देशातील शेतीच्या विकासाचा दर १८ ते २० टक्यापर्यंत जाईल. आपल्याकडे अर्थशास्त्र आणि पर्यावरण हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. हवेत होणाऱ्या प्रदूषणातील ४० टक्के प्रमाण हे वाहनांमुळे होत असल्याने इंधनाला वेगवेगळे पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
इथेनॉल पासून विमानाला लागणारे इंधन तयार करण्यास आता सुरवात झाली असून येत्या पाच महिन्यात चारचाकी तयार करणाऱ्या महिंद्रा, टोयोटा, हुंदाई, टाटा या कंपन्या १०० टक्के बायो इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणणार आहेत, त्याबरोबरच दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या देखील त्याच इंधनाचा वापर करून तयार केलेली वाहने बाजारात आणणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.
इथेनॉल हा विषय समजावून सांगून त्यापासून कशा प्रकारचे फायदे होतात, हे समाजाला समाजावून सांगण्याचे कठीण काम डॉ. प्रमोद चौधरी यांनी यशस्वीपणे केले आहे, इतकेच नव्हे तर त्यांनी या क्षेत्रात केलेले संशोधन देखील मोलाचे राहिले आहे. पेट्रोल बरोबरच डिझेलमध्ये देखील १५ टक्के इथेनॉल टाकण्याच्या संदर्भातील प्रस्ताव एआरएआय या संस्थेकडे असल्याचेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले.
इथेनॉलच्या क्षेत्रात होत असणाऱ्या या बदलाने नजीकच्या काळात ग्रामीण भागातील गावे देखील शहरांप्रमाणे स्मार्ट होतील, त्यामधून आत्मनिर्भर भारत उभा राहू शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणे शक्य होईल. जैव इंधनाच्या क्षेत्रातील डॉ. चौधरी यांच्या योगदानामुळे आपल्याला आत्मनिर्भर भारत घडवणे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी केलेल्या कामाचा देशाच्या विकासाला चांगला फायदा होईल. असे गडकरी यावेळी म्हणाले.
तंत्रज्ञान आणि धोरणे एकत्रितपणे राबवली गेली तर त्यामधून चांगल्या प्रकारचा विकास साधणे शक्य होते. आपल्याला नितीन गडकरी यांच्या माध्यमातून चांगले नेतृत्व आणि डॉ. प्रमोद चौधरी यांच्या माध्यमातून संशोधन करणारा उदयॊजक मिळाल्यामुळे या क्षेत्रात आपली प्रगती करणे सहजसाध्य होत असल्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.
शिशिर जोशीपुरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अतुल मुळे यांनी आभार मानले. चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
