आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दिवाळी पहाटचे ३ नोव्हेंबर रोजी आयोजन
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने येत्या रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार असून त्यासाठी सर्वांना विनामूल्य आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमातील काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.
दीपावलीच्या मंगल प्रसंगी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा आस्वाद रसिकांना घेता यावा या उद्देशाने आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आम्ही या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
कार्यक्रमामध्ये किराणा घराण्याचे युवा गायक विराज जोशी, प्रसिद्ध गायक आनंद भाटे, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र श्रीनिवास जोशी, ज्येष्ठ शिष्य व सुप्रसिद्ध गायक पं उपेंद्र भट आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचे सादरीकरण होईल.
