फतेचंद नगराज रांका यांची पुणे सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
सभेच्या सुरुवातीला हॉलमार्किंग, जीएसटी (GST), पी.एम.एल.ए. (PMLA) व एच.यु.आय.डी. (HUID) या विषयांवर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारचे मार्गदर्शन मुंबईचे प्रसिद्ध तज्ज्ञ सीए भावीन मेहता यांनी केले. मेहता यांनी उत्कृष्ट व सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने समजावून सांगितले व त्यामुळे उपस्थितांना अनेक कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदीचे ज्ञान मिळाले.
सेमिनार नंतर सर्वसाधारण सभेचे पहिले सत्र सुरू झाले. सदस्यांना वेळोवेळी कायद्याची माहिती व्हावी म्हणून संस्थेतर्फे ‘सुवर्णपत्र’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. यावेळी प्रमुख पाहुणे संजय घोडावत (चेअरमन – संजय घोडावत ग्रुप) यांच्या हस्ते सुवर्णपत्राचे प्रकाशन करण्यात आले. सुवर्णपत्राचे संपादक शैलेश रांका व सह-संपादक जयंत रणधीर यांचे संजय घोडावत यांनी सुंदर सुवर्णपत्राबद्दल विशेष कौतुक व प्रशंसा केली. प्रमुख पाहुणे संजय घोडावत (चेअरमन – संजय घोडावत ग्रुप) यांनी तरुणांना व्यवसायामध्ये कशाप्रकारे यशस्वी व्हावे, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी घोडावत यांच्या हस्ते खालील पुरस्कार देण्यात आले. गोविंद उर्फ अजित विश्वनाथ गाडगीळ यांना पुणे सराफ जीवन गौरव पुरस्कार – २०२४ प्रदान करण्यात आला. ५० वर्ष जुनी प्रगतीशील पेढी या विभागात दिलीप सोनिगरा ज्वेलर्स व श्रीपाद शंकर नगरकर सराफ यांना पुरस्कार देण्यात आले. योगेंद्र डी. अष्टेकर व विशाल गणेश वर्मा यांना प्रगतिशील तरूण सराफ व्यावसायिक पुरस्कार तर शिवेंद्र ज्वेलर्स व मनिष ज्वेलर्स यांना प्रगतीशील होलसेल व्यापारी या श्रेणीतील पुरस्काराने गौरवण्यात आले.
सभेच्या तिसऱ्या सत्रामध्ये मावळत्या सर्व कार्यकारीणी सदस्यांनी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन अध्यक्ष फतेचंद रांका, उपाध्यक्ष नितीन अष्टेकर,सेक्रेटरी अमृतलाल सोळंकी व खजिनदार कुमारपाल सोळंकी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर सभा सत्र चार मध्ये कार्यकारणी मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक ठरल्याप्रमाणे घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जेष्ठ सदस्य रूपचंद सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकारीणी मंडळाची निवडणूक घेण्यात आली. रूपचंद सोनी यांनी खालील प्रमाणे निकाल जाहीर केले.
फतेचंद नगराज रांका (अध्यक्ष), अभय गाडगीळ (उपाध्यक्ष), अमृतलाल मांगीलाल सोळंकी (सचिव), राजेंद्र सोमनाथ वाईकर (सह सचिव) व कुमारपाल घिसुलाल सोळंकी (खजिनदार). विशेष म्हणजे या सर्व पदाधीकारांची निवड बिनविरोध करण्यात आली.
नवीन निवडून आलेल्या कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष फतेचंद रांका हे आठव्यांदा अध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले. सन १९८७ ते २०२४, गेली ३७ वर्ष फतेचंद रांका संस्थेवर कार्यरत आहेत. सन १९८७ ते २०००, अशी १३ वर्ष संस्थेचे सचिव म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. सन २००० ते २०२४ या कालावधी करता अध्यक्ष या पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. सन २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधी करता फतेचंद रांका अध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. पुणे सराफ असोसिएशनच्या ७०० पेक्षा अधिक सदस्यांमध्ये सलग ३७ वर्ष महत्त्वाच्या पदावर कार्य करणारे फतेचंद रांका एकमेव सदस्य ठरले आहेत. रांका यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पार पडली आहेत. सेल्स टॅक्स, व्हॅट, एलबीटी, एक्साईज, गोल्ड कंट्रोल अॅक्ट यामधील जुलमी कलमांचा विरोध करून सरकारच्या निदर्शनास कायद्याच्या तरतुदी कशा प्रकारे व्यवसायाला बाधक आहेत हे समजावून ती कलमे रद्द करण्यात यश मिळवले.
पुणे महानगरपालिकेने सदस्यांवर दाखल केलेले एकूण ६५० ऑक्ट्राय (Octroi) संबंधी फौजदारी खटले फतेचंद रांका यांनी स्वतः चालवले व सर्वच्या सर्व खटले जिंकून सदस्यांची यामधून निर्दोष मुक्तता करून दिली व त्याचप्रमाणे कोट्यावधी रुपयांची पुणे महानगरपालिकेने मागितलेली ऑक्ट्राय (Octroi) ची रक्कम मेहरबान कोर्टाने संपूर्णपणे रद्द-बादल केली.
