‘देशविघातक कृत्ये करणाऱ्यांविरोधात सामूहिक जबाबदारीने लढण्याची गरज’
कमोडोर (निवृत्त नौसेना अधिकारी) प्रो. एस. एल. देशमुख यांचे मत
पुणे : आपली माध्यमे, शिक्षणव्यवस्था तसेच सामाजिक भेदाभेद, यांचा विपरीत फायदा देशविघातक शक्ती घेत आहेत. विविध संस्थांच्या बुरख्याआडून आपल्या देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडता यांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न संघटितरीत्या केला जात आहे. हा धोका वेळीच ओळखून आपण समाज आणि व्यक्ती म्हणून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. या शक्तींविरोधात कारवाई करणाऱ्या आपल्या शासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत कमोडोर (निवृत्त नौसेना अधिकारी) प्रो. एस. एल. देशमुख यांनी व्यक्त केले. या देशविरोधी कारवायांच्या पाठीमागे अमेरिका, चीन आणि पाकिस्तानची अभद्र युती असल्याचेही ते म्हणाले.
पुणे संवादच्या वतीने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या फिरोदिया सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी ‘शेपिंग दी स्टोरी : दी पॉवर ऑफ सिव्हिल सोसायटीज् इन नरेटिव्हज् अँड मूव्हमेंट्स’ या विषयावर पारदर्शिकांच्या साह्याने मांडणी केली. पुणे संवादचे मनोज पोचट तसेच भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रो देशमुख म्हणाले, “देशात अनेक सामाजिक संस्था सामाजिक, शैक्षणिक कार्याच्या पडद्या आडून विदेशांकडून निधी घेऊन आपल्याच देशाचे नुकसान करणाऱ्या कारवाया करत आहे. अशा अनेक संस्थांचे छुपे अजेंडे देशाचे व समाजाचे नुकसान करत आहेत. देशहिताच्या विरोधात आपल्याच माध्यमांना, शिक्षणसंस्थांना भडकवण्याचे काम केले जात आहे. अशा सर्व संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच त्यांना मिळणाऱ्या निधीवर लेखापरीक्षणाद्वारा नियंत्रण आणणे गरजेचे आहे. तसेच देशातील ज्या संस्था अथवा व्यक्ती, विदेशी संस्थांसह हातमिळवणी करून मोठ्या आर्थिक उलाढाली करत आहेत, त्यांच्यावरही नजर ठेवणे आवश्यक आहे. भारतीय शिक्षणसंस्थांवर घाला घालून, स्वतःची शैक्षणिक संकुले उभारणाऱ्या विदेशी विद्यापीठांवरही नियंत्रण ठेवले पाहिजे. सामाजिक वातावरणात कटुता आणि अस्वस्थता निर्माण करणारी विदेशी निधीवर चालणारी अवास्तव सर्वेक्षणे, त्यांचे निष्कर्ष, आणि त्यांच्या प्रसार-प्रचाराची आक्रमक अभियाने यांच्यावर बंदी घातली पाहिजे.”
आपल्या देशाचे नागरीक म्हणून आपण वैयक्तिक तसेच सामूहिक स्तरावर अशा वृत्तींवर नियंत्रण ठेवू शकतो, ही जाणीव समाजात सर्वत्र निर्माण केली पाहिजे. सरसकट या विशिष्ट संस्थांचे निष्कर्ष, अंदाज, आरोप यावर विश्वास न ठेवता, वस्तुस्थिती जाणून घेणे, स्वतः अभ्यास आणि संशोधन करणे, चुकीची आकडेवारी, अवास्तव विधाने यांना बळी न पडणे, जात, धर्म, पंथ, वंश, वर्ण, भाषा.. या कशाही पेक्षा आपला देश आहे, म्हणून आपण आहोत, याचे सदैव स्मरण ठेवणे आणि आपली संस्कृती, मूल्ये, कुटुंबव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था यांच्यावरचे पाश्चात्त्य आक्रमण झुगारणे हे आपले अग्रक्रम असले पाहिजेत असेही प्रो देशमुख यांनी संगितले.
“राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक तेढ, दुरावा निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ न देणे, विविधतेतील एकतेचा भंग होऊ न देणे, बेकायदेशीर कृत्ये, माध्यमांचा गैरवापर टाळणे, शासकीय पातळीवरील संस्थांच्या कामकाजाला सहकार्य करणे, भ्रष्टाचार आणि घरभेदीपणाला ठाम नकार, यांचा अंगिकार केल्यास आपण सामूहिक जबाबदारीच्या भावनेने या धोक्यावर मात करू शकू, असेही प्रो देशमुख यांनी नमूद केले. अमृता यादव यांनी सूत्रसंचालन केले.
