‘मेरी रातें, मेरी सड़के’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : सात च्या आत घरात राहण्याचे बंधन झुगारून पुण्यातील महिलांनी रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत ‘मेरी रातें, मेरी सड़के’ कार्यक्रमाची पहिली रात्र उत्साहात साजरी केली. सारसबागेसमोरील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळ झालेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी महिलांनी कविता आणि गाणी गायली व महिला म्हणून जगताना आलेले अनुभव खुलेपणाने सांगितले.
महिला जागर समिती (पुणे) तर्फे शनिवारी रात्री ९ ते ११ दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी योगदान दिलेल्या समाजातील विविध महिलांच्या स्मृतीस अनुसरून १२ रात्रीचे कार्यक्रम साजरे होणार आहेत. मुलींनी शिकून स्वालंबी व्हावं, निर्भय व्हावं या उद्देशाने ही पहिली रात्र ‘सावित्री-फातिमा तुझ्या ज्ञानाने भय इथले संपवायचे आहे’ या संकल्पनेवर आधारित साजरी करत असल्याचे अभिव्यक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या अलका जोशी यांनी सांगितले. महिलांचा प्रत्येक क्षेत्रातला पुढाकार वाढावा आणि विविध प्रश्नांवर संघटित होऊन आपला आवाज उठवावा म्हणून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वकील असुंता पारधे, सामाजिक कार्यकर्ते मृणालिनी वाणी, सगुणा महिला संघटनेचे शोभा करांडे यांनी यावेळी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. महिला सक्षमीकरणासाठी पुण्यात सुरु केलेल्या गुलाबो गँग या अभिनव उपक्रमाबाबत संगीत तिवारी यांनी माहिती दिली. शाळामधून गुड टच-बॅड टच सारखे उपक्रम तर व्हायला पाहिजेत पण घरकामात वडिलांनी जर हातभार लावला तर आपसूकच लहानपणापासून मुल संवेदनशील पध्द्तीने विचार करायला लागतात, असा परखड मत समितीचे सदस्य नीता परदेशी यांनी मांडले.
उपक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. उपस्थित महिलांनी सार्वजनिक ठिकाणी विनयभंग, छेडछाडीबाबत झालेल्या घटनांना कशा पद्धतीने हाताळल्या याबाबतचेही अनुभव सांगितले. साऊ फातिमाचा इतिहास सर्वांनां सांगणार, ‘हम भारत कि नारी है, फुल नही चिंगारी’ है या घोषणा यावेळी देण्यात आल्या. ‘साऊ पेटती मशाल’ हे गाणं यावेळी घेण्यात आले. ओय नजर संभाल, महिलांवरील हिंसाचार आता बस असा सामाजिक संदेश देणारे टि-शर्टही बनविण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची दुधाने यांनी केले. कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी सूत्रसंचालन केले.
