भारतातील ४० दशलक्ष अंधांना दृष्टी देण्यासाठी प्रत्येकाने नेत्रदान करा – निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले
पुणे : अंध व्यक्तींमध्ये जी जिद्द दिसते ती निश्चितच कौतुकास्पद आहे. मानवी जीवनात अत्यावश्यक असणाऱ्या पाच इंद्रियांपैकी एक इंद्रिय नसून देखील त्याच्यावर मात करून ते आपले आयुष्य जगतात आणि जिद्दीने यशस्वी देखील होतात ही खूप मोठी गोष्ट आहे. नुकत्याच झालेल्या पॅरालिम्पिक मध्ये खेळाडूंनी जिंकलेल्या पदकांवरून ते लक्षात येते. भारतात सगळ्यात जास्त ४० दशलक्ष अंध आहेत. त्यामुळे नेत्रदान करण्याचा संकल्प सगळ्यांनी करा, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीने ३९ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेतील गणेश सभागृहात झाला. यावेळी भूषण गोखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा डॉ. राधिका परांजपे, डॉ. अश्विनी मिसाळ (सचिव), डॉ वृषाली वारद (खजिनदार ) व डॉ. समीर दातार (संयोजक) उपस्थित होते.
यावेळी समीर दातार यांनी दिग्दर्शित केलेला नेत्रदानावर आधारित दृष्टिकोन हा लघुपट दाखवण्यात आला. नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे मनोगत, नेत्रदानातून दृष्टी प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांचे मनोगत, दृष्टिहीन व्यक्तींकरिता केलेल्या उपक्रमांची ओळख तसेच, नेत्रदान जनजागृती पर डॉ. भक्ती दातार यांचे गायन व कलाकारांचे नृत्य सादरीकरण झाले.
नेत्रदान जनजागृतीसाठी डॉ. समीर दातार यांनी दिग्दर्शित केलेल्या लघुपटाचे अनावरण यावेळी झाले. नेत्रदान जनजागृती साठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील यावेळी झाला. नेशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड च्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या सकीना बेदी म्हणाल्या, मानवी जीवनात डोळ्यांचे महत्त्व काय आहे हे ज्यांना डोळे नाहीत त्यांना विचारा. चुकीच्या धारणा न ठेवता प्रत्येकाने नेत्रदान करून मृत्यूच्या पश्चात आपले अस्तित्व टिकवून ठेवा. डॉ. समीर दातार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अश्विनी मिसाळ यांनी प्रास्ताविक तर डॉ वृषली वारद यांनी आभार प्रदर्शन केले.
