Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

श्रीवत्स सोफोश आणि संतुलन संस्थेला यंदाचा बाल कार्य सन्मान जाहीर

 

पुणे : ‘मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०७ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे दिनांक २८ सप्टेंबर रोजी गंज पेठेतील टिंबर मार्केटजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात बाल कार्य सन्मान श्रीवत्स सोफोश संस्था आणि संतुलन पुणे या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलमुख्य यश गुजराथी यांनी दिली.

शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणा-या कुलरंग महोत्सवात पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्नल विक्रम पत्की (निवृत्त) हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत.

कार्यकारी कुलमुख्य श्लोक मराठे म्हणाले, यंदाच्या सन २०२४-२५ वर्षाचा पुरस्कार ससून रुग्णालयाच्या आवारात कार्यरत असलेल्या श्रीवत्स, सोफोश या अनाथ मुलांचा सांभाळ करणा-या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने चेअरपर्सन सीए सचिन अभ्यंकर आणि शर्मिला सय्यद या पुरस्कार स्विकारणार आहेत. तसेच सन २०२३-२४ वर्षाचा पुरस्कार दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या संतुलन, पुणे या संस्थेला देण्यात येणार आहे. संतुलन संस्थेच्या अ‍ॅड. पल्लवी रेगे आणि अ‍ॅड. बस्तू रेगे हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. सन्मानचिन्ह, भेटवस्तू, स्मरणिका असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सहाय्यक कुलमुख्य साक्षी वाडकर म्हणाल्या, पुणे शहर भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळाले आहे. यावेळी कुलरंग महोत्सवांतर्गत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम देखील होणार आहेत.महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी व श्री शिवाजी कुलाच्या आजी-माजी कुलवीरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading