Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

‘जाप साहिब’ या ग्रंथाच्या रूपाने धर्माच्या नावावरील भेद कमी होतील – डॉ पंडित विद्यासागर

पुणे  : प्रत्येक धर्मातील नागरिक हे कोणते न कोणते ईश्वरीय तत्व मानतात, फक्त प्रत्येकाची आचरण पद्धती ही वेगवेगळी आहे. त्यामुळे सर्व धर्म हे एकच ईश्वरीय तत्त्व मानणारे असून येत्या काळामध्ये हाच विचार रुजविणे आवश्यक आहे. आज आपण ज्या पद्धतीने धर्माबद्दल विचार करतो आहोत ती पद्धती योग्य नाही असे मला वाटते. ‘जाप साहिब’ या निवृत्त विंग कमांडर विजय चतुर लिखित ग्रंथाने किमान धर्माच्या नावावरील भेद कमी होण्यास मदत होईल असा विश्वास नांदेड येथील रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केला.

पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने निवृत्त विंग कमांडर विजय चतुर लिखित ‘जाप साहिब’ ग्रंथाचे प्रकाशन आज कर्वे रस्त्यावरील स्वामीकृपा सभागृह येथे डॉ पंडित विद्यासागर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, कार्याध्यक्ष कृष्णा राजाराम अष्टेकर, खडकी एम एच गुरुद्वाराचे प्रतिनिधी एस एस अहलुवालिया आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यासोबतच प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुलभा राजीव यांना डॉ पद्मावती श्रोत्रिय स्मृती संत चोखामेळा पुरस्कार तर उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आबा गायकवाड यांना विनायकराव जोशी स्मृती हिंदी लेखक- शिक्षक पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात आले.

‘जाप साहिब’ या ग्रंथात ज्या प्रकारची भाषा वापरली आहे त्यामध्ये लालित्य, माधुर्य तर आहे यासोबतच हे सर्व बाजूंचा विचार करायला लावणारे पुस्तक आहे असे डॉ पंडित विद्यासागर यांनी नमूद केले. निसर्ग, मनुष्य प्राणी आणि ईश्वरीय तत्त्वाविषयी बोलताना डॉ. विद्यासागर म्हणाले, “मानवाला कायमच अस्तित्त्वाबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत. मानवाच्या अस्तित्वाशी निगडीत असलेले ईश्वरीय तत्व हे निसर्गाच्या समतोलाशी जोडलेले आहे. आपल्याला जर अस्तित्व टिकवायचे असेल तर हा समतोल बिघडू देता कामा नये.” ईश्वरीय तत्त्व टिकून ठेवायचे असेल व त्यासोबतच आपले अस्तित्व नष्ट होऊ द्यायचे नसेल तर निसर्गाशी प्रामाणिक रहा असा सल्ल्लाही त्यांनी दिला.

ग्रंथाबद्दल बोलताना निवृत्त विंग कमांडर विजय चतुर म्हणाले, “हा ग्रंथ म्हणजे गुरु गोविंद सिंह यांचा काळ आणि पंजाबचा जणू इतिहास आहे. हे केवळ एक आध्यात्मिक पुस्तक नसून यामध्ये साहित्यिक भाषा व काव्यातील सुंदरता आहे. सर्वोच्च परमेश्वराला जाणून घेण्याचा गुरु गोविंद सिंह यांनी सांगितलेला हा भक्ती मार्ग आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना करताना डॉ. अशोक कामत म्हणाले, “छत्रपती शिवाज महाराजांना संपवायला आलेला औरंगजेब पुन्हा दिल्लीला जाऊ शकला नाही तो गुरु गोविंद सिंह यांच्या धास्तीमुळेच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य शिखांचे गुरु गोविंद सिंह यांनी पुढे नेले असे मला वाटते. आज नव्या पिढीसमोर शिवाजी महाराज यांच्या नावावर चालणारे राजकारण बंद व्हायला हवे आहे. शिवाजी महाराज हा राजकारण अथवा सत्ताकारणाचा विषय नाही तर नीतीमत्तेचा विषय आहे हे आज सामान्य नागरिकांना समजणे महत्त्वाचे वाटते.” ज्ञानी लोकांसाठी प्रतिष्ठानने ज्ञानेश्वरी तर सिद्ध केली आहेच शिवाय मुसलमान व दलित बांधवांसाठी मराठवाडी हिंदी भाषेतही आम्ही ज्ञानेश्वरी सिद्ध केली असल्याचे डॉ. कामत म्हणाले.

यानंतर सुलभा राजीव आणि आबा गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आरती मोने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शुभदा वर्तक यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading