Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

मुंबई  : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एनसीपीए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत उद्या 18 सप्टेंबर रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र देशात प्रथम
आता तापमान वाढीचे युग संपून होरपळीचे युग सुरू झाल्याने त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेने व्यक्त केली आहे. त्यास प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीची स्थापना केली असून त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री श्री. शिंदे आहेत. अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमून संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ देखील तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली. त्याशिवाय औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5 टक्के बायोमास वापरायचे देखील निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 11 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading