Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

दोन श्रेष्ठ कलाकारांमधील कलात्मक आदानप्रदानाचे सादरीकरण रंगले

पुणे  :  प्रयोगशील ललित कलांमधील बंध गुंफत, शास्त्रीय संगीताच्या बंदिशींचा मेळ भरतनाट्यम नृत्य शैलीशी घालणारा अनोखा नृत्याविष्कार शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. ‘स्वर-नृत्य-प्रभा’ या कार्यक्रमातून दोन श्रेष्ठ कलाकारांमधील कलात्मक आदानप्रदान उलगडत गेले.

स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या पहिल्या जयंतीनिमीत्त कलावर्धिनी ट्रस्टच्या वतीने टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे ‘स्वर नृत्य प्रभा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला होता. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी,  शिल्पा जोशी,  तालयोगी पं. सुरेश तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रभाताईंनी नटभैरव, चंद्रकंस, भैरवी, भिन्न षड्ज, सरस्वती, हेमावती अशा रागांत बांधलेल्या बंदिशी, सरगम, चतरंग भरतनाट्यम् नृत्यशैलीला अनुकूल करवून सुचेताताईंनी आणि त्यांच्या शिष्यांनी जे सादरीकरण केले, त्या कलात्मक विचाराला आणि अभिव्यक्तीला रसिकांनी मनमोकळी दाद दिली.

कार्यक्रमाची सुरवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू आणि किराणा घराण्याचे युवा गायक विराज जोशी यांच्या गायनाने झाली. त्यांनी प्रभाताईना आदरांजली म्हणून त्यांनीच गाजवलेला राग मारुबिहाग सादर केला. ‘कल नाही आए’ हा विलंबित एकताल आणि ‘जागू मै सारी रैना’ ही द्रुत त्रितालमधील प्रभाताईंची सर्वपरिचित बंदिश विराज यांनी सादर केली. त्यांना आशय कुलकर्णी यांनी तबला तर यशवंत थिटे यांनी संवादिनीवर साथ केली.

यावेळी बोलताना डॉ सुचेता चापेकर म्हणाल्या, “कलेतील संशोधन आणि प्रयोगशीलता यांचा संयोग म्हणजे भरतनाट्यम आणि हिंदुस्थानी संगीतातील ‘नृत्यगंगा’ हा आविष्कार. या प्रयोगाच्या निमित्ताने ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी नाते जुळले. कलात्मक बंध निर्माण झाले. दुर्दैवाने यावर्षी डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यामुळे डॉ प्रभा अत्रे यांसारख्या प्रयोगशील कलावतीला नृत्यामधून आदरांजली अर्पण करण्यासाठी कलावर्धिनी ट्रस्टच्या वतीने ‘स्वर नृत्य प्रभा’ सादर करावा, असे वाटले. प्रभाताईंशी वेळोवेळी झालेल्या संवादातून त्यांच्या काही बंदिशी नृत्यानुकूल आहेत, हे जाणवले होते. शिवाय प्रभाताईंनी मोठेपणा दाखवून खास माझ्यासाठी काही रचना करून दिल्या. त्यांना त्यांच्या रचनांवरील नृत्याविष्काराने मानवंदना देण्याचा हा प्रयत्न आहे.”

कलावर्धिनीच्या अध्यक्षा अरुंधती पटवर्धन यांनी नृत्यगंगा या उत्तर हिंदुस्तानी संगीत आणि दाक्षिणात्य भरतनाट्यम नृत्यशैलीचा अनोखा संगम साधणाऱ्या प्रयोगाची माहिती देत शिष्यांसह विविध रचना सादर केल्या. ‘बाजे डमरू डम शिव नाचे रे…’, ‘आवो प्यारे नंदलाल…’, ‘मन सुमिर श्रीगणेश…’, ‘आन पडी मझधार…’ अशा सर्व रचना रसिकांची दाद मिळवणाऱ्या ठरल्या.

डॉ सुचेता भिडे चापेकर यांनी एकल नृत्यातून प्रभाताईंच्या बंदिशींमधून व्यक्त झालेले तरल भाव नृत्य, अभिनय आणि पदन्यासातून मांडले. यावेळी ऋषिकेश बडवे (गायन), आशय कुलकर्णी (तबला), यशवंत थिटे (संवादिनी), कृष्णा साळुंखे (पखावज) व सुनील अवचट (बासरी) यांनी साथसंगत केली. यशश्री पुणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading