सब-ज्युनियर राष्ट्रीय रोलबॉल : मुलींमधून आसाम संघाला विजेतेपद
पुणे – अवंतिका बसरने केलेल्या २ गोलांच्या जोरावर आसाम संघाने राजस्थान संघाला पराभूत करताना सबज्युनियर राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेतील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु असलेल्या स्पर्धेतील मुलींच्या अंतिम लढतीमध्ये आसाम संघाने राजस्थानला ३-२ असे पराभूत केले. लढतीच्या पहिल्याच मिनिटामध्ये राजस्थानच्या देविका योगीने गोल करताना राजस्थान संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र आसामच्या अवंतिका बसरने तिसऱ्या व पाचव्या मिनिटाला गोल करून आसाम संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आसामच्या ह्रीदिका शर्माने ९ व्या मिनिटाला गोल करून आसामची आघाडी ३-१ अशी वाढविली. मध्यंतराला आसाम संघाने ३-१ अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरानंतर राजस्थानच्या विधी शर्माने १८ व्या मिनिटाला गोल करून ३-२ अशी आघाडी कमी केली. त्यानंतर मात्र, दोन्ही संघाचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले.
उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये अतितटीच्य लढतीमध्ये राजस्थान संघाने ओडिसा संघाला जादा वेळेत (एक्स्ट्रा टाइम) ११-५ असे पराभूत करताना अंतिम फेरी गाठली होती. निर्धारित वेळेत लढत ५-५ अशी बरोबरीत राहिली होती. ओडिसा संघाच्या आश्लेषा पांड्याने तब्बल ५ (०.३५, २, १०, १४ व १६ मिनिट) गोल केले. राजस्थान संघाकडून विधी शर्मा (१, ११ मिनिट), व देविका योगीने (१३, १८ मिनिट) यांनी प्रत्येकी २ तर प्रांजल शर्माने १ (१९ मिनिट) गोल केला. जादा वेळेत राजस्थान संघाने तब्बल ६ गोल करण्यात यश मिळविले. यामध्ये देविका योगी (२१, २५, २६ मिनिट) व प्रांजल शर्मा (२२, २४, २९ मिनिट) यांनी प्रत्येकी ३ गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या लढतीमध्ये आसाम संघाने उत्तर प्रदेश संघाला ६-३ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. आसाम संघाकडून तोशी रुंगटाने ३ (७, १८, १९ मिनिट), अवंतिका बसरने २ (१, ८ मिनिट) तर द्रीष्टी देवीने १ (१५ मिनिट) गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उत्तर प्रदेश संघाकडून आराध्याने २ (६, १२ मिनिट) तर साक्षीने १ (११ मिनिट) गोल केले.
तत्पूर्वी उत्तर प्रदेश संघाने आंध्र प्रदेश संघाला 15-1 असे, झारखंड संघाने केरळ संघाला 10-2 असे, तामिळनाडू संघाने महाराष्ट्र संघाला 7-5 असे तर आसाम संघाने ओडिसा संघाला 9-5 असे पराभूत करताना मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटाचे बक्षीस वितरण खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, उद्योजिका सुप्रिया बडवे, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, भारतीय रोलबॉल संघांचे अध्यक्ष तपन आचार्य, उपाध्यक्ष मनोजकुमार यादव, सचिव चेतन भांडवलकर, पुणे रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे, परवेझ रिझवी आदी मान्यवर उपस्थित होते.
