एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशा बाबद गणेशोत्सवानंतर निर्णय – देवेंद्र फडणवीस
मुंबई : भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भवितव्याबाबत केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला असून तो आम्हाला मान्य असेल. त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया गणेशोत्सवानंतर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहे.
मूळचे भाजपचे असलेले, मात्र कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे स्वगृही परतण्यासाठी दीर्घकाळ उंबरठ्यावर उभे आहेत. दिल्ली भेटीच्या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश झाला असल्याचा खडसे यांचा दावा आहे. मात्र, पक्षाकडून अद्याप तशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही किंवा खडसे यांना अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे आपल्या पक्षप्रवेशाची घोषणा लांबवली जात असल्याचा आरोप खडसे यांनी यापूर्वी केला आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी आपल्याला राज्यपालपद बहाल करण्याचे आश्वासन दिल्याचा दावाही खडसे यांनी नुकताच केला आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, खडसे नेमके काय म्हणाले ते मी ऐकले नाही. मात्र, त्यांच्या भवितव्याबाबत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला असून गणेशोत्सवानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
ना घर का ना घाट का?
या पुढील काळात भाजप पक्षप्रवेशाबाबत आपण फुली मारण्याचा खुलासा खडसे यांनी नुकताच केला आहे. आपण चाळीस वर्ष निरपेक्ष भावनेने पक्षाचे काम केले. त्यासाठी हालअपष्टा सोसल्या. अपमान आणि चेष्टा सहन केली. बहुजन वर्गाला पक्षाशी जोडण्याचे काम केले. मला पुन्हा पक्षात घ्या हे मी त्यांना सांगितले नव्हते. त्यांच्याकडूनच पुन्हा परत या, असे आमंत्रण देण्यात आले होते. तरीही आपल्या पक्षप्रवेशाची घोषणा होत नसेल तर, मला पक्षात घ्या, अशी विनंती मी त्यांना करणे, माझ्यासाठी अपमानास्पद आहे, असे खडसे म्हणाले. आता भाजपा प्रवेशाची वाट बघण्यापेक्षा पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काम जोमाने सुरू करणार, असेही ते म्हणाले. मात्र, खडसे यांच्यासाठी ही वाट ही सोपी असणार नाही. दुसऱ्या पक्षात प्रवेश मिळत नाही म्हणून पुन्हा आपल्या पक्षात येणाऱ्या नेत्यांच्या निष्ठा तपासून पहा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते राज्यातील पक्ष नेतृत्वाला बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परतल्यानंतर तरी खडसे यांना कितीसा सन्मान प्राप्त होणार, हा एक प्रश्नच आहे.
