Monday, August 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

३६व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन 

पुणे : ३६व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन उद्या (दि. १३) सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच अजित पवार पुणे फेस्टिव्हलला हजेरी लावणार आहेत. यावेळी छत्रपती खा. शाहू महाराज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधानपरिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील, खा. मेधा कुलकर्णी, खा. सुनेत्रा पवार व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष डॉ. वझहत मिर्झा हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचलनालयाचे संचालक डॉ. बी. एन पाटील हे याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.

पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिकमहाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचलनालय आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंतांना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’, तसेच ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरविले जाते. यंदा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द.  फडणीस आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरविले जाईल. तसेच ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि पर्यटनस्थळ बनलेल्या मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे देवराम गोर्डे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन सन्मानाने गौरविले जाणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळांचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जय गणेश पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. यंदा गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading