Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागविण्यासाठी भारताकडे विचारणा; प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांचे मत

 

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. विद्यार्थी हा परीक्षार्थी न होता, त्याचा सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. अनेक राष्ट्रांच्या तंत्रज्ञानाची भूक भागविण्यासाठी भारताकडे विचारणा होत आहे. भारतातील तरुणांनी जगावर राज्य करावे, यासाठी पुढचा २५ वर्षांचा सुवर्णकाळ आहे. आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. पुढची पिढी चांगली व सक्षम होण्याकरिता शैक्षणिक संस्था कार्य करीत आहेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरु डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने ८ वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, अभिरुची मॉल चे सुनील भिडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम.एन.नवले, आदर्श कुलगुरु म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ जबडे, आदर्श प्राचार्य म्हणून टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे आणि एच.व्ही.देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, चांगले विद्यार्थी व नागरिक निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्न करतात. राजकारण, समाजकारण प्रत्येक क्षेत्रात आपण चांगले कार्य करीत पुढे जायला हवे. शिक्षणासोबत इतर गोष्टी देखील शिकून पुढे जायला हवे. आयुष्यात काय व्हायचे आहे, हे विद्यार्थी दशेतील वयात ठरवायचे असते. ज्या दिशेला जायचे, त्या दिशेला प्रयत्नपूर्वक जाऊन यशस्वीतेचा पाठलाग करायला हवा.

प्रा.एम.एन.नवले म्हणाले, पूर्वी शिक्षकांमध्ये असलेला साधेपणा, चांगुलपणा आता काही प्रमाणात नाहीसा होताना दिसत आहे. तुमचा प्रवास कसाही असो, ध्येय व आत्मविश्वास मात्र हवा. त्यातून पुढे यशस्वी वाटचाल करता येते. मार्ग खडतर असतात, त्यावरून जायला हवे. शिक्षक हे राष्ट्र घडविण्यात मोठे योगदान देतात. त्यामुळे शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करावे.

डॉ.सिद्धार्थ जबडे म्हणाले, जग बदलत चालले आहे. मानव संसाधन हा नैसर्गिक स्तोत्र आपल्या भारतात आहे. भारतामध्ये बुद्धिमत्तेचा महासागर आहे. विद्यार्थी हे डिजिटल माध्यमांशी जोडले गेले आहेत. पूर्वी फक्त शिक्षक माहिती देत होते. आता साधनांमुळे यामध्ये बदल झाला आहे. विद्यार्थ्याची जडणघडण हा महत्वाचा विषय आता आहे. स्क्रीनच्या बाहेर काढून समाजामध्ये काय चालले आहे? इथपर्यंत विद्यार्थ्यांना न्यायला हवे.

प्रा. गणेश राऊत म्हणाले, विद्यार्थी कधीही बिघडलेले नसतात. शिक्षकांनी स्वतः मध्ये बदल करून शिक्षण द्यायला हवे. शिक्षक होणे हे अत्यंत जिकिरीचे होत चालले आहे. वाचणे, लिहिणे, ऐकणे, बोलणे या सर्व गोष्टींचा सामना करावा लागत असल्याने या दिशेकडे येणा-यांचे प्रमाण कमी आहे.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, मातृ पितृ देवो भव, आचार्य देवो भव ही आपली परंपरा आहे. ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. आजच्या पिढीला चांगल्या दर्जाचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम संस्था करीत आहे. भारतीय संस्कृती आजच्या पिढीमध्ये रुजवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान संस्था करीत आहे. आई वडील आणि शिक्षक हे भारताचे भविष्य घडवू शकतात, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading