Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत राडा

आंबेगाव:  भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच त्यांच्यात राडा झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असलेले शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. 

वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निकम यांच्या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्या दिल्या नाहीत. शरद पवार गटाच्या नेत्यांना मंचावर येऊ दिले नाही, असे आरोप करत दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. एकमेकांच्या अंगावर धावून गेले. काहींनी तर एकमेकांवर खुर्च्या ह उगारल्या. खुद्द वळसे पाटील यांनी शांततेचे आवाहन करूनही संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना जुमानले नाही. हा राडा तब्बल दोन तास सुरूच होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून देवदत्त निकम यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बाहेर घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आपल्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले नाही. उलट सभास्थानी आलेल्या कार्यकर्त्यांना हाकलून लावण्यासाठी गुंड मागवण्यात आले होते. कारखान्याच्या सभेच्या निमित्ताने वळसे पाटील यांनी स्वतःचा प्रचार करून घेतला, असे आरोप देवदत्त निकम यांनी सभास्थानावरून बाहेर पडल्यावर केले. 

वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. देशात सर्वात कार्यक्षम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत निकम यांच्या कार्यकर्त्यांनी अकारण राजकीय वळण दिले आणि गोंधळ घातला. या सगळ्यातून त्यांनी नेमके काय साधले असा सवाल करीत वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याचे नाव विनाकारण बदनाम झाल्याचा आक्षेप घेतला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading