Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या बद्दल नारायण राणे यांचा नवीन दावा

मुंबई: दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती करणारा दूरध्वनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्याला आल्याचा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

दिशा सालीयान मृत्यू प्करणी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार आरोप केले जात आहेत. विशेषतः नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी आदित्य यांना लक्ष्य केले आहे. नितेश राणे यांनी तर याप्रकरणी आदित्य यांच्या सहभागाचे कथित पुरावे बंद लिफाफ्यात सभागृहात सादर केले आहेत. 

या प्रकरणात आदित्यला सांभाळून घेण्याची विनंती करण्यासाठी ठाकरे यांच्याकडून आपल्याला दूरध्वनी आला. आदित्यला सांभाळून घ्या. तुम्हालाही दोन मुले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे राणे यांनी सांगितले. त्यावर, तुम्ही तुमच्या मुलाला संध्याकाळी सात नंतर घराबाहेर जाऊ देऊ नका, असा सल्ला दिल्याचेही राणे म्हणाले. 

मालवणमध्ये शिवछत्रपतींचा पुतळा ढासळल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या ‘जोडे मारो’ आंदोलनावरही राणे यांनी टीका केली. जोडे मारण्याशिवाय यांना दुसरे येते तरी काय, असा सवाल करून राणे म्हणाले की, आता जोडे मारण्याचे आंदोलन करणाऱ्यांपैकी किती जण पुतळा उभारल्यानंतर त्याच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मालवणात आले ते दाखवून द्यावे. 

या प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे याला सत्ताधाऱ्यांनी लपवून ठेवल्याच्या आरोपाचा राणे यांनी इन्कार केला. जयदीप आपटे किती दिवस फरार राहणार? कधी ना कधी त्याला अटक होईलच. त्याने वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय पुतळा ढासळण्याच्या कारणांचा उलगडा होणार नाही, असेही राणे म्हणाले. कोणी काही म्हणाले तरी राजकोटावर शिवछत्रपतींचा पुतळा पुन्हा दिमाखात उभारला जाणार. पुतळ्याची निर्मिती दर्जेदार असणार. त्यामुळे सध्या पुतळ्याचा विषय बाजूला ठेवा आणि लोकांच्या कामाविषयी बोला, असे आवाहनही त्यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही राणे यांनी टीका केली. शरद पवार यांची पावले दोन दिवस उलटले की पुढे मागे होतात. ते आज जे बोलले तेच उद्या बोलतील असे नाही. निवडणूक काळात ते काहीही बोलू शकतात, असेही राणे म्हणाले. 

आपण काही वर्षांपूर्वी रेल्वेमंत्र्यांना वैभववाडी ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे मार्ग विकसित झाल्यास त्यामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळेल, याची माहिती दिली होती. कोकण मध्ये तयार होणारा कृषी माल घाटावर घेऊन जाण्यास त्यामुळे मदत होईल, असे आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी त्यांनी या मार्गावर रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही राणे म्हणाले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading