Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी काढलेली अधिसूचना रद्द

मुंबई:  विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली जाऊ नये यासाठी राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी काढलेली अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळें सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक लागणार आहे. 

 नागपूर ते गोवा हा ८०९ किमी लांबीचा शक्तीपीठ महामार्ग उभारण्याची सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या प्रस्तावित महामार्गाच्या उभारणींनंतर नागपूर ते गोवा अठरा तासाचा प्रवास निम्म्याहून कमी वेळेत पूर्ण होईल असा दावा केला जात आहे. वर्धा जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत जाणारा हा महामार्ग राज्याच्या 13 जिल्ह्यांमधून जाणार आहे. या महामार्गासाठी तब्बल 27 हजार हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. पुढील वर्षी महामार्गाच्या कामाचा शुभारंभ करून सन 2030 पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्याचा सरकारचा मानस होता. मात्र, जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

राज्यातील तीन शक्तीपीठे या महामार्गावर असल्याने या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय दोन ज्योतिर्लिंग देखील या महामार्गाने जोडली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर, पट्टणकोडोली, आदमापूर, सोलापूरचे सिद्धेश्वर देवस्थान अशी देवस्थाने ही या महामार्गाने जोडली जाणार आहेत. 

मात्र, घोषणेपासूनच शक्तीपीठ महामार्ग वादाचे केंद्र ठरला आहे. या महामार्गासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनींपैकी मोठ्या प्रमाणावर जमिनी बागायती असल्यामुळे शेतकऱ्यांचा या अधिग्रहणाला ठाम विरोध आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून जमीन अधिग्रहणाला आपला विरोध तीव्रपणे व्यक्त केला आहे. सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेत्यांनी देखील स्थानिक राजकारण लक्षात घेऊन या प्रकल्पाला विरोधच केला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी उडवणे सरकारला परवडणारे नाही. अनेक नकारात्मक मुद्द्यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागला. त्यात शक्तिपीठ महामार्गाच्या अधिग्रहणाची भर पाडण्याची सरकारची तयारी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला अनुसरून शक्तीपीठ महामार्गासाठीचे जमीन अधिग्रहण रद्द केले जाणार आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading