भाजपने ‘मेगा भरती’ करून सर्व पक्षांना भ्रष्टाचारमुक्त केले : खासदार सुप्रिया सुळे
मुंबई: भारतीय जनता पक्षाने बाकी काही केले नसले तरी ‘मेगा भरती’ करून सर्व पक्षांना भ्रष्टाचारमुक्त केले आहे. त्यामुळे आता आमच्यावर इतर कुठले आरोप झाले तरी भ्रष्टाचाराचे आरोप होऊ शकत नाहीत. इतर कोणत्याही आरोपांपेक्षा ते सौम्यच आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची खिल्ली उडविली.
राज्यात विधानसभा निवडणूक निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होईल. ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू करण्यात येईल. नोव्हेंबर महिन्यात मतदान होईल आणि निकालही त्याच महिन्यात येतील, अशी शक्यताही सुळे यांनी व्यक्त केली. निवडणूक जेवढ्या लवकर जाहीर होतील, तेवढा जास्त वेळ उमेदवारांना मिळू शकेल, असेही त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करण्यासाठी दोन दिवसात घटक पक्षांची बैठक होईल. त्यानंतर आठ ते दहा दिवसात जागा वाटपाबाबत निश्चित निर्णय झालेला असेल, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
शिक्षणाचे माहेरघर बनले गुन्हेगारीची राजधानी
पुणे शहरात नुकतीच झालेली नगरसेवकाची हत्या आणि इतर गुन्हेगारी कारवायांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुळे म्हणाल्या की, पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. आतापर्यंत विद्येचे माहेरघर ही पुण्याची ख्याती होती. केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला येत असतात. मात्र मागील काही काळात घडलेल्या गुन्हेगारी घटना पाहता पुणे ही गुन्हेगारीची राजधानी झाली आहे. पोलिसांवर हल्ले करण्याइतपत कोयताग्यांची हिंमत वाढली आहे. पोलिसांचा, गृहमंत्रालयाचा आणि कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही. त्यामुळे लोकांचा कायदा सुव्यवस्थेवर विश्वास उरलेला नाही.
