‘पीअरसन’तर्फे ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ परीक्षेसाठी सर्वसमावेशक चाचणी तयारी मालिका सादर
कोटा : पीअरसन (एफटीएसई: पीएसओएन.एल) या शैक्षणिक साहित्य निर्मिती करणाऱ्या जागतिक कंपनीने जेईई मेन आणि जेईई अॅडव्हान्स्ड या स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांकरीता एक नवीन जेईई अॅडव्हान्स्ड पीसीएम मालिका (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांसाठी) सुरू केली आहे. दरवर्षी सुमारे १२ लाख विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेची आणि २.५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तयारी करीत असतात. ‘पीअरसन’ने सादर केलेल्या नवीन सर्वसमावेशक पुस्तक मालिकेद्वारे अकरावी, बारावी आणि तेरावी (रिपीटर) या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणे सोयीचे होणार आहे. राजस्थानातील कोटा या शहरात आयोजित एका कार्यक्रमात ‘पीअरसन’च्या या नव्या मालिकेचे प्रकाशन झाले. यावेळी ‘जेईई अॅडव्हान्स्ड पीसीएम’ मालिकेचे लेखक ओम शर्मा, अनन्य गांगुली आणि राहुल सरदाना यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.
या प्रकाशन समारंभात ‘पीअरसन इंडिया’चे कंट्री हेड विनय स्वामी म्हणाले, “जागतिक पातळीवर भारतीय अभियंत्यांची कामगिरी उठून दिसत असते आणि असे उत्कृष्ट अभियंते घडविण्याच्या दृष्टीने भारत हे जागतिक केंद्र बनले आहे. भारतातील जेईई ही या क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह आणि न्याय्य प्रवेश परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्ष कठोर परिश्रम, शिस्त, समर्पण आणि तयारी करणे आवश्यक असते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना साध्या सोप्या भाषेत व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी कोटा येथील उच्च श्रेणीच्या अनुभवी शिक्षकांनी आमची ही नवीन जेईई पीसीएम अॅडव्हान्स्ड मालिका निर्माण केली आहे.”
अठरा भागांच्या या पुस्तक मालिकेत सखोल सिद्धांत, असंख्य चित्रे, विषय-आधारित सराव चाचण्या आणि पाठ यांचा समावेश आहे. ‘जेईई’च्या प्रगत व मुख्य या दोन्ही स्तरांसाठी, तसेच ‘ऑलिम्पियाड’साठीदेखील आवश्यक ती मूलभूत तत्त्वे आणि तांत्रिक ज्ञानाचा मजबूत पाया तयार करण्यात या मालिकेची विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते. ही मालिका कोटा येथील काही अत्यंत दिग्गज लेखकांनी लिहिली आहे. यातील अनन्य गांगुली हे रसायनशास्त्राचे शिक्षक व मार्गदर्शक आहेत, ओम शर्मा हे भाभा अणुसंशोधन केंद्रातील माजी शास्त्रज्ञ आहेत, तर राहुल सरदाना हे भौतिकशास्त्राचे प्रशिक्षक व मार्गदर्शक आहेत.
‘पीअरसन जेईई पीसीएम’ पुस्तक मालिकेत भौतिकशास्त्रावर ७, रसायनशास्त्रावर ६ आणि गणितावर ५ अशी एकूण १८ पुस्तके आहेत. संपूर्ण भारतातील प्रमुख दुकानांमध्ये आणि ‘अॅमेझॉन’सारख्या ई-कॉमर्स मार्केटप्लेसवर ही मालिका उपलब्ध असेल.
